टंचाईच्या काळात रेल्वेकडूनही ग्रामस्थांची कोंडी



कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या या वाडीतील आदिवासी महिला कर्जत आणि लोणावळा या दोन स्थानकातून पिण्याचे पाणी घरी घेऊन जात असत. मात्र रेल्वे प्रशासनाने ट्रेनमधून पाणी वाहून नेण्यास हरकत घेतल्याने या वाडीत पाणीटंचाईचे चटके अधीकच जाणवत आहेत. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थ खालापूर तालुक्यातील गावात जाऊन पाणी विकत घेत आहेत.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गाची निर्मिती झाली आणि बोरघाटात स्टेशन ठाकूरवाडी हे आदिवासींची वस्ती असलेले गाव अस्तिवात आले. कर्जतयेथून पुण्याकडे जात असताना खंडाळा आणि कर्जतच्या अगदी मधोमध स्टेशन ठाकूरवाडी वसली आहे. कर्जत तालुक्यातील या वाडीत रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर पाण्यासाठी एक विहीर खोदली आहे. या विहिरीतील पाणी दरवर्षी मार्च महिन्यात आटते. त्यानंतर या वाडीमधील महिला लोणावळा आणि कर्जत या रेल्वे स्थानकात येऊन पिण्याचे पाणी प्लास्टिक कँनमध्ये भरून आणतात. मागील वर्षी जिल्हा परिषद सदस्याने ट्रँकर पाठवून वाडीमध्ये काही काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते. मात्र वाडीमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता धोकादायक असल्याने यावर्षी वाडीमध्ये एकही ट्रँकर पोहचला नाही. कर्जत तालुक्यातील चोची या गावातून पाण्याचा ट्रँकर वाडीत यायचा, परंतु त्या रस्त्याने येताना गाडी कधीही खाली दरीत कोसळू शकते अशी स्थिती असल्याने स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे ट्रँकर पोहचत नाही आणि त्यामुळे मार्च महिन्यापासून येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागते.
या वाडीतील महिला वर्षानुवर्षे कर्जत आणि लोणावळा या दोन रेल्वे स्थानकात येऊन प्लास्टिक कँनमधून पाणी भरून घरी नेत असत. त्यावेळी स्टेशन ठाकूरवाडीतील महिला सकाळी पाणी नेण्यासाठी रिकामे कँन कर्जतकडे येणार्या रेल्वे गाडीमध्ये टाकून आणायच्या आणि दुपारी पुण्याला जाणार्या शटल गाडीतून पुन्हा त्या महिला पाणी घेऊन घरी जायच्या. मात्र यावर्षी मध्य रेल्वेच्या गाडीमधून पाणी नेण्यास रेल सुरक्षा दलाने विरोध केला आहे.त्यांनी कर्जत बरोबरच लोणावळा स्थानकातून पाणी नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे स्टेशन ठाकूरवाडीमधील ग्रामस्थांची कोंडी झाली आहे. परिणामी या वाडीतील महिलांना पाण्यासाठी एक डोंगर पार करून खालापूर तालुक्यात जावे लागत आहे. जांबरूग येथील एक टेम्पो चालक त्या ठिकाणी पाण्याचा ट्रँकर घेऊन येतो आणि 15 लिटर क्षमतेचा प्लास्टिक कँनला 20 रुपये दर आकारून तो पाणी विकत असतो. पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन कर्जतचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी चालत जाऊन स्टेशन ठाकूरवाडी गाठली आणि तेथील पिण्याचे पाण्याची स्थिती जाऊन घेतली.
स्थानिकांना पाण्याचा थेंब नाही
स्टेशन ठाकूरवाडीला लागूनच रेल्वे मार्ग आहे, पुण्याला जाणार्या एक्सप्रेस गाड्या काहीकाळ या ठिकाणी थांबतात. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या रेल्वे कामगारांसाठी कर्जत येथून एक जलवाहिनी आली आहे. तेथे रेल्वे कामगार गरज असेल त्यावेळी नळ सुरू करतात. मात्र स्थानिकांना पाण्याचा थेंब देत नाहीत. त्यामुळे रेल्वे विरुद्ध स्थानिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.
कर्जत तालुक्यातील पाणी पुरवठा कृती आराखड्यात स्टेशन ठाकूरवाडीचे नाव दरवर्षी असते, पण तेथे एकदाही ट्रँकर येत नाही. तेथील महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरवायचे असतील, तर रेल्वेने पाणी दिले पाहिजे.
-प्रभावती लोभी, सरपंच, ग्रुपग्रामपंचायत-बीड, ता. कर्जत
कर्जत येथून रेल्वेमार्गाने एक जलवाहिनी आली आहे. त्या जलवाहिनीमधून रेल्वेने तात्पुरती सोय म्हणून किमान पाणीटंचाई काळात पाणी पुरवठा करावा, असे आपण रायगड जिल्हाधिकारी यांना सूचित करणार आहोत.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-कर्जत