Breaking News

जिल्ह्यात एक लाख 76 हजार लसीचा पुरवठा

आरोग्य प्रशासनाकडून पहिल्यांदाच 35 ग्रामपंचायतींना लसीचा पुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) एक लाख 76 हजार लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील 35 लसीकरण मान्य ग्रामपंचायतींना पहिल्यांदाच प्रत्येकी 200 लसीचा पुरवठा आरोग्य विभागाकडून केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.

जिल्ह्यात आलेल्या लसीचे वितरण करण्यात आले असून दोन दिवसात ही लसीकरण मोहीम पूर्ण केली जाणार असल्याचे डॉ. मोरे यांनी म्हटले आहे. ज्या ग्रामपंचायतीची यंत्रणा लसीकरण करण्यास तयार आहे त्या 35 ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

कोविड प्रतिबंधात्म लसीकरण मोहीम जिल्ह्यात वर्षभरापासून सुरू आहे. आतापर्यत 13 लाख 89 हजार 183 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मंगळवारी जिल्ह्याला एक लाख 76 हजार लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. दोन दिवसात हे लसीकरण पूर्ण करणार असल्याने त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीचे वितरण करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात आलेला हा लसीचा साठा फायदेशीर ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यात आरोग्य विभागामा़र्फत लसीकरण मोहीम सुरू असली तरी खाजगी लसीकरणही जोरदार सुरू आहे. काही ग्रामपंचायतीमार्फत खाजगी लसीकरण मोहीम स्वतःच्या पातळीवर सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही ग्रामपंचायत स्तरावर लसीचा साठा देण्यात आला नव्हता. मात्र आता आलेल्या पावणे दोन लाख लसीच्या साठ्याच्या अनुषंगाने ग्रामपचायतींनाही लस पुरवठा केला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 200 लस पुरवठा केला जाणार आहे. यासाठी 35 ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीला प्रशासनाने लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गावातील नागरिकांसाठी लसीकरणसाठी पुढाकार घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply