पनवेल : वार्ताहर
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात सर्व प्रशासन यंत्रणा मेहनत असून नागरिकही सहकार्य करीत आहेत. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश महासचिव व नगरसेवक विक्रांत पाटील हे या विषयात विशेष जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विक्रांत पाटील यांनी यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता यासंदर्भातील विशेष पत्रक तयार करून ते प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली, तसेच सर्व हॉटेल, सलून, किराणा व अन्य दुकाने यांना लेखी पत्र देऊन कर्मचार्यांनी सक्तीने मास्क वापरावे व हँड सॅनिटायझरचा सातत्याने उपयोग करावा असे सुचित केले. डिजिटल मीडियाचा उपयोग करत प्रत्येकाला या रोगाविषयी जनजागृती करणारी माहिती ते वेळोवेळी पोहोचवत आहेत, त्यांच्या या विशेष मेहनत घेऊन केलेल्या प्रयत्नांबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
याविषयी माहिती देताना विक्रांत पाटील म्हणाले की, महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी बजावत आहे, अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना व्यावसायिक ठिकाणे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, नागरिकही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तसेच त्यांनी विनंती केली आहे की, नागरिकांनी सतर्क राहून जर बाहेरच्या देशातून कोणी नागरिक येऊन आपल्या सोसायटीमध्ये अथवा आजूबाजूला राहत असेल व त्याच्या हातावर ’होम क्वारनटाईन’ हा शिक्का असूनही तो बाहेर फिरत असेल तर महापालिका प्रशासन, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अथवा माझे जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधून त्वरित कळवा जेणेकरून योग्य ती कारवाई करणे शक्य होईल.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी घरातून बाहेर न पडता सकाळी 7 ते सायंकाळी 9 या वेळेत ’जनता कर्फ्यू’ पाळावा या केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, नागरिकांना कोणत्याही समस्या अथवा सूचना असल्यास 9819675666 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अथवा थेट जनसंपर्क कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.