कळंबमध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाई; ट्रँकरने पाणीपुरवठा करण्यात अडथळे



कर्जत : बातमीदार
तालुक्यातील कळंब या मोठ्या लोकसंख्येच्या गावात मागील 10 वर्षातील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्या पाचही विहिरी आटल्या असून, बोअरवेल कोरड्या पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, हे गाव पाणी पुरवठा कृती आराखड्यात समाविष्ट नसल्याने ट्रँकरने पाणी देण्यात अडचणी असल्याचे शासकीय अधिकारी सांगत आहेत.
कर्जत-मुरबाड राज्यमार्ग रस्त्यावरील कळंब हे गाव सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहेत. 1980 च्या दशकात या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी साळोख येथील पाझर तलावातील पाण्यावर नळपाणी योजना उभारण्यात आली आहे. चार किमी अंतरावरील साळोख तलावाच्या कालव्यात विहीर बांधून तेथून कळंब गावात पाणी आणले आहे. सातत्याने दुरुस्ती करावी लागत असल्याने ही नळपाणी योजना मागील 15 वर्षांपासून कोलमडून गेली आहे. 10 वर्षे तर त्या योजनेतून पाण्याचा थेंबदेखील कळंब गावात पोहचलेला नाही.
नळपाणी योजना बंद पडल्यानंतर पोश्री नदीमध्ये सिमेंट बंधारा बांधून व त्या बंधार्याच्या खाली विहीर बांधून जिल्हा परिषदेने कळंब गावासाठी पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या सिमेंट बंधार्याला पहिल्याच वर्षी गळती लागल्याने ही पाणी योजनादेखील कोलमडली असून, कळंब गाव अनेक वर्षे स्वतःच्या नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहे.
बोरगाव रस्त्यालगत असलेल्या बोअरवेलला भरपूर पाणी आहे. ते पाणी उचलून कळंब गावातील चार विहिरीत सोडले जायचे आणि त्या विहिरीमधील पाणी नंतर ग्रामस्थ भरायचे. असे मागील नऊ वर्षे सुरू असताना, यावर्षी त्या बोअरवेलनेदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे गावातील चारही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्याच बरोबरच गावातील अनेक खासगी बोअरवेलही पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. त्यामुळे कळंब ग्रामस्थांना पाण्यासाठी आता साळोख गावात जावे लागत आहे. साळोख गाव कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.
कळंब गावात अनेक खासगी बोअरवेल आहेत. मागील दोन महिने खासगी बोअरवेलचे मालक हे ठराविक वेळी आपल्या परिसरात शेजार्यांना पाणी देत होते. त्यावेळी बोअरवेल हिंदूची आहे, की मुस्लिम, हेदेखील कोणी बघत नसे. त्या खासगी बोअरवेलही आता पाण्याअभावी बंद पडल्या आहेत. त्यामुळे सामाजिक ऐक्य असलेल्या कळंब गावात पाणीटंचाईने सर्वांची झोप उडवून टाकली आहे.
कळंब गावात मोठ्या संख्येने मुस्लिम धर्मीय आहेत. त्यांचे रमजान महिन्याचे रोजे सुरू आहेत. अशावेळी गावातील पाणी आटल्यामुळे हिंदू धर्मियांसह मुस्लिम कुटुंबेदेखील परेशान आहेत.पाणी विकत घेण्याची इच्छा असूनही काही सोय नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-शहनवाझ पानसरे, ग्रामस्थ, कळंब, ता. कर्जत
आमच्याकडे असलेल्या ट्रँकरच्या माध्यमातून आम्ही पाणी गावात पुरवठा सुरू केला आहे, पण गाव मोठ्या लोकवस्तीचे आहे. बोअरवेलची पाईपलाईन अज्ञातांनी कापल्याने बोअरवेलचे पाणी सर्व ठिकाणी पोहचत नाही.
-माधुरी बदे, सरपंच, कळंब ग्रामपंचायत
कळंब हे गाव तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट नाही, त्यामुळे शासकीय ट्रँकर देता येत नाही. आम्ही ग्रामपंचायतीला पत्र दिले असून, त्यांच्या पातळीवर ट्रँकर सुरू केल्यास आमची काही हरकत नाही.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती-कर्जत
गाव पाणीटंचाई कृती आराखड्यात नाही, म्हणून पाणी दिले जात नाही, हे सर्व ठीक आहे, पण माणुसकीच्या भावनेतून पाणी पुरविण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची आहे, त्यामुळे नळपाणी योजनेबाबत माहिती घेऊन कळंब गावाला पाणी पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत