पोलादपूर तालुक्यात गेल्या 20 व्या शतकाच्या अखेरीस स्थानिक पतसंस्थांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेला ’सहकाराचं कोंबडं आरवण्यापूर्वीच कापून खाल्लं’ असा नैराश्यजनक अनुभव दिल्यानंतर नव्या 21 व्या शतकाचे पहिले दशक संपल्यानंतर परजिल्ह्यातील न्यू सातारा पतसंस्था, मोरेमाऊली पतसंस्था-मुंबई आणि चिपळूण नागरी पतसंस्था या तीन पतसंस्थांनी आगमन केले आहे. सहकाराची विश्वासार्हता संपुष्टात आणणार्या स्थानिक बुडीत पतसंस्थांच्या पदाधिकार्यांचे लांगूलचालन करण्याचे सत्र या पतसंस्थांनी अवलंबिले आहे. यामुळे आधीच्या पतसंस्था व राष्ट्रीयकृत बँकांना जेरीस आणणार्या सराईत कर्जबुडव्यांना नवीन संधी चालून आल्याचे दिसून येत आहेत. अलिकडेच, गेल्या पंधरवडयात अवसायनात निघालेल्या पोलादपूर तालुका पतसंस्थेच्या संचालकांना सहकार खात्याकडून नोटीसा बजाविण्यात आल्या असून या सहकार खात्याकडून संचालकांना वारंवार दिलासा देण्याने ठेवीदारांच्या बुडीत रक्कमांचा परतावा होण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही.
पोलादपूर तालुक्यात पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्था, पोलादपूर तालुका सरकारी कर्मचारी पतसंस्था, सिध्दीविनायक पतसंस्था, कामथी-ढवळी-सावित्री पतसंस्था, प्राथमिक शिक्षक पतपेढी, माजी सैनिक पतसंस्था, महाड येथील जिजामाता पतसंस्था व जनकल्याण पतसंस्था गेल्या शतकाच्या अखेरीस सुरू होऊन एकामागून एक अशा पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्था, महाड येथील जिजामाता पतसंस्था बंद पडल्या तर काहींचे कामकाज ठप्प झाले. यामुळे ठेवीदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले तर कर्जबुडव्यांमध्ये संचालक मंडळाच्या संगनमताने बोगस प्रकरणांना मंजुरी घेऊन कर्जाऊ रक्कम उचलण्याची व ती बुडवण्याची प्रवृत्ती बोकाळली. यानंतरही या कर्जबुडव्यांनी नातेवाईकांच्या नांवे कर्ज घेऊन ती बुडविल्याने नातेवाईकांना तुरुंगात जाण्याची वेळ ओढवल्याच्या काही घटना आहेत. ठेवीदारांनी सुरू केलेल्या कायदेशीर लढाईत बुडीत पतसंस्थांच्या संचालकांना ठेवीदारांच्या भरपाईच्या रक्कमेची जबाबदारी सहकार आयुक्त आणि जिल्हा ग्राहक मंचातर्फे निश्चित करण्याचे निर्णयदेखील झाले आहेत. मात्र, सहकार कायद्याने अद्याप संचालकांच्या मालमत्तेवर जप्ती व विक्रीचे आदेश न दिल्याने संचालक मालमत्ता विक्री तसेच रक्कम भरण्याचे टाळण्यासाठी अपिलात जात असून स्वत:ची राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पत नसल्याने नव्याने आलेल्या पतसंस्थांमध्ये नातेवाईकांच्या नावाने कर्जप्रकरणे करून तसेच सोनेतारण योजनेत बोगस सोन्याचे तसेच ग्राहकांचे दागिने गहाण ठेऊन कर्ज उचलत आहेत. एकीकडे, सहकार खात्याने पतसंस्थांना शाखाविस्तार करताना बुडीत पतसंस्था अधिग्रहित करण्याची अट घातली असताना त्यातही काहीशी शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यातील पतसंस्थांनी स्थानिक पतसंस्था अधिग्रहित करण्याऐवजी त्यांच्याच जिल्ह्यातील डबघाईस आलेली पतसंस्था विलीन करून शाखाविस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. परिणामी, स्थानिक बुडीत पतसंस्थांना दिलासा मिळण्याऐवजी त्या कायमच्याच रसातळाला जातील, हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी, गेल्या 10-15 वर्षांमध्ये पोलादपूर तालुक्यात सहकाराचा स्वाहाकार सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावण्यास कारणीभूत ठरला आहे.
पोलादपूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून न्यू सातारा पतसंस्थेने अलिकडेच बिल्डींग कंस्ट्रक्शन व्यवसायातही गुंतवणूक केल्याने तालुक्यातील ठेवीदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरेमाऊली पतसंस्थेने मुंबईमध्ये आणि पोलादपूर तालुक्यात आध्यात्मिक कार्यासोबत सहकाराची जोड देऊन यंत्रणा चालविल्याने तिची वाटचाल नेत्रदिपक राहिली आहे. अलिकडेच, पोलादपूर शहरात आलेल्या चिपळूण नागरी पतसंस्थेने शहरासह तालुक्यात सोनेतारण कर्जाचे बॅनर्स लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, हे धोरण पोलादपूर तालुक्यातील बुडीत पतसंस्थांच्या सराईत संचालकांच्या क्लुप्त्यांना वाव देणारे आहे.
पोलादपूर तालुक्यातील पतसंस्था बुडविण्याचा अनुभव असलेल्या सराईत एका माजी संचालकाने सोनेतारण कर्जवाटपावेळी जो दागिना घेऊन येईल तो त्याचाच दागिना असल्याचे आणि तो चोख सोन्याचा असल्याची दुहेरी खातरजमा न करताच कर्जमंजूरी तात्काळ केली जात असल्याचा फायदा उचलत परजिल्ह्यातील पतसंस्थांमध्येदेखील दागिने तारण ठेऊन कर्ज उचलण्याच्या क्लुप्ती वापरली. तालुक्यात ज्या सराफी व्यवसायिकांकडून दागिने परत मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून पोलीस ठाण्यात दाखल होऊनही दूर्लक्ष झालेले दागिने तसेच चोख सोने नसलेले दागिने परजिल्ह्यातील पतसंस्थेमध्ये तारण ठेवले जात असल्याच्या घटना उघड होऊनही पतसंस्थेच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे फारशी चर्चा झाली नाही. तालुक्यात बेकायदेशीर इमारतीवर कर्ज घेऊन बुडविणार्या कर्जबुडव्याच्या इमारतीवर जप्ती आणली तरी ती दुसर्याच्याच जमिनीवर बांधली असल्याने तिचा लिलाव होऊ शकत नसल्याचे उघड झाले असूनही परजिल्ह्यातील एका पतसंस्थेने पहिले बुडीत कर्ज फेडण्यासाठी सदर कर्जबुडव्याला नव्याने कर्ज मंजूर करून इमारत बेकायदेशीर असल्याचे जमीनमालकाने निदर्शनास आणूनही दूर्लक्ष केले आहे. याच बेकायदेशीर इमारतीवर सहकार विभागाने जप्ती आदेशही बजावला असून भूमीअभिलेख, पतसंस्था आणि सहकार विभागाने मूळ जमीनमालकाच्या नैसर्गिक न्याय तत्वाने मालकी हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न लवकरच फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यात दाखल होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये दोन वकीलांनी चक्क भूमिअभिलेख कार्यालयाच्या चुकीच्या 3 ब प्रकारच्या मालमत्ता पत्राला अनुसुरून पतहिन संचालकाला मालमत्तेची मालकी सर्चरिपोर्ट द्वारे करून बारकौन्सिलकडून डीबार होण्याची कारवाई होण्याइतपत खोटेपणा केलेला दिसून येत आहे.
अलिकडेच, अवसायानात गेलेल्या पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्थेच्या संचालकांना पुन्हा सहकार खात्याकडून नोटीसा बजाविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून चौकशी आणि वसूली अधिकारी या संचालकांशी संगनमत करून जप्ती प्रक्रिया टाळत असल्याचे दिसून आले आहे.
-शैलेश पालकर, खबरबात