टोळीने लाखो लुबाडले; पोलिसांकडून शोध सुरू
पनवेल ः वार्ताहर
क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून एका टोळीने कामोठे येथील नागरिकाची एक लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे येथील बाळासाहेब दुरगुडे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावरून एलआयसीच्या हप्त्याचे पैसे भरत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा नसल्याचे समजले. बँकेत जाऊन चौकशी केली असता, यूपीआयद्वारे त्यांचे पैसे वळते झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी त्यांचा मुलगा अथर्व यांच्याकडे विचारपूस केली असता त्याला क्रिप्टोवरून इन्स्टाग्राम खात्यावरून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून त्याबद्दल जास्त पैसे मिळवून देतो, असे कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार त्याने क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक लाख 11 हजार 836 रुपये पाठवले होते. त्यानंतर दुरगुडे यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता कुमार याने त्याला ब्लॉक केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुरगुडे यांनी कामोठे पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
गेल्या काही दिवसांपासून पैशाचे अमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.