Breaking News

पनवेलसह रायगडात घंटानाद आंदोलन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार; मंदिरे खुली करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारूच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या, मात्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर, धार्मिक स्थळांचे टाळे अद्यापही उघडलेले नाही. ते राज्य सरकारने खुले करावे या मागणीसाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 29) मंदिरात आरती करून घंटानाद आंदोलन करण्यात आले. ’दार उघड उद्धवा दार उघड, दारूचे नव्हे तर भक्तीचे दार उघड’, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आंदोलन झाले.
 कोरोना काळात जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील मांस, मदिरा सर्वकाही सुरू केले, मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ’हरी’ला बंदिस्त करून ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तत्काळ खुली करण्यात यावी या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल शहरातील श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भरपावसात हे आंदोलन झाले. यामध्ये नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेवक मदन कोळी, माजी नगरसेविका नीता माळी, संजय जैन, पवन सोनी, अमरिश मोकल, छतरमल मेहता, मनोज डेडिया, अभिजीत जाधव, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर पनवेल तालुक्यात विविध ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आध्यात्मिक आघाडी, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकार हे भजन, पूजन करणार्‍या भाविक-भक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. ’भाविक-भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल’ असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने 4 जून 2020 रोजी परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरूसुद्धा झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर राखून आवश्यक नियम, अटी, शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांकडून होत आहे, मात्र पुनश्च हरिओम म्हणून हरीला बंदिस्त करून ठाकरे सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले आहे.
राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तनाला परवानगी मिळावी या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत-महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थान, तीर्थक्षेत्र येथील उदरनिर्वाहाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी सर्वत्र देवस्थान, मंदिरे, धार्मिक स्थळांसमोर सामाजिक अंतराचे पालन करून घंटानाद आंदोलन केले. ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ असे म्हणत या वेळी राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply