पनवेल ः प्रतिनिधी
स्वच्छतेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी
(दि. 6) प्रभाग 3मध्ये झालेल्या स्वच्छता महाअभियानात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल पालिका व पनवेल भाजपच्या संयुक्त विद्यमाने महापालिका हद्दीत 10 जूनपर्यंत स्वच्छता महाअभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी प्रभाग 3मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली. स्वच्छता मोहिमेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, शहर अध्यक्ष
निर्दोष केणी, साजिद पटेल, मन्सूर पटेल, जगदीश घरत, शफी पटेल, संतोष पाटील, मुनाफ पटेल, सचिन वास्कर, आशा बोरशे, दिलीप केणी, संदीप पांडे, रमेश मढ़वी, रमेश सावंत, जयदास तेलवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पनवेल-सावंतवाडी गाडीच्या डब्यात गांधील माशांचे पोळे; प्रवाशांत घबराट
पनवेल ः प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या शनिवारी सकाळी सुटलेल्या हॉलिडे स्पेशल पनवेल-सावंतवाडी गाडीच्या डब्यात गांधील माशांचे पोळे आढळल्याने प्रवाशांत एकच घबराट पसरली होती. या प्रकाराने घाबरून अनेक प्रवासी या डब्यातून उतरून दुसर्या डब्यात गेले. प्रवासात चालू गाडीत माश्यांनी हल्ला केला असता, तर जीवावर बेतले असते, असे सांगून प्रवाशांनी याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोकण रेल्वेने चाकरमान्यांना कोकणात सुटीत गावी जाण्यासाठी आणि मुंबईला परत येण्यासाठी खास हॉलिडे स्पेशल गाड्या सोडल्या आहेत. 1 जून रोजी पनवेलहून सकाळी 8.15 वाजता सुटणार्या सावंतवाडी हॉलिडे स्पेशल गाडीच्या मोटरमनच्या मागील डब्यात प्रवाशांनी प्रवेश करताच डब्यात लटकत असलेले गांधील माशांचे पोळे पाहून त्यांच्यात घबराट पसरली. या माश्या विषारी असल्याने त्या चावल्यास काय होईल या भीतीने पुढील भागातील अनेक प्रवासी डबा सोडून दुसर्या डब्यात गेले.
या गाडीतून प्रवास करणारे नवीन पनवेलमधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी तिकीट तपासनीसाच्या ही गोष्ट लक्षात आणली. माश्यांनी हल्ला केला असता तर प्रवाशांना पळताही आले नसते.
कोकण रेल्वेने प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याच्या प्रकाराची दखल घेत बोगीची साफसफाई करणारा ठेकेदार व तपासणी अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी व्यक्त केली आहे.