Breaking News

खारकोपर स्टेशनसमोरील शिवस्मारक आणि खेळाचे मैदान आरक्षित जागा सुशोभित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेली सहा वर्षे संघर्ष केल्यानंतर अखेरीस सिडकोने खारकोपर रेल्वेस्टेशनसमोरील शिवस्मारक आणि खेळाच्या मैदानासाठीची सेक्टर 12मधील प्लॉट नंबर 3 व 4 ही जागा आरक्षित केली आहे. ही जागा तातडीने विकसित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली आहे.
गेली तीन वर्षे याच ठिकाणी समितीतर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. या वर्षीही सोमवारी (दि.19) भव्य दिव्य प्रमाणात साजरी करण्यात आली. उलवे आणि परिसरातील लोकांच्या भावना या नियोजित शिवस्मारकाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे अटल सेतूच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यासाठी सर्व शिवप्रेमी उत्सुक आहेत. यंदाच्या शिवजयंती उत्सव सोहोळ्यात कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले की, हा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभारण्याची संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांचीच. रामशेठ यांनी मनावर घेतले तर ते काहीही करून दाखवतील. जनार्दन भगतसाहेबांनी या भागाच्या विकासाचा पाया रचला आणि रामशेठ यांनी त्यावर कळस चढवला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जेथे हात लागतो त्या बाबीचे सोने होते. गव्हाण ग्रामपंचायतीने या खेळाच्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव एकमताने दिल्याचे महेंद्र घरत म्हणाले. आम्ही या भागाचा विकास करताना पायातल्या राजकारणाच्या चपला बाहेर काढतो आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, असेही घरत शेवटी म्हणाले.
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी 17 डिसेंबर 2018 रोजी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत सविस्तर पत्र लिहिले होते. त्यामध्ये खारकोपर स्टेशनसमोरील सेक्टर 12मधील पाच हजार चौरस मीटर (0.5 हेक्टर) जागा ही शिवस्मारकासाठी आणि 20 हजार चौरस मीटर (2 हेक्टर) जागा खेळाचे मैदान विकसित करून देण्यासाठीची मागणी केली होती. पुन्हा 1 फेब्रुवारी 2019 रोजी सिडकोच्या अध्यक्षांसोबत या दोन्ही जागांबाबत बैठक झाली. त्यानंतर 4 ऑगस्ट 2020 रोजी पुन्हा याच मुद्द्यांवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे दोन्ही भूखंड विकसित करण्याबाबत लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कमिटीने पत्र दिले. सिडको अध्यक्षांच्या उपस्थितीत 1 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीला लोकनेते रामशेठ ठाकूर, सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सेक्रेटरी आणि कामगार नेते महेंद्र घरत तसेच मुख्य अभियंता वरखेडकर, अधिक्षक अभियंता गिरी, अतिरिक्त मुख्य नियोजनकार मानकर उपस्थित होते.
सिडकोचे तत्कालीन नवे अध्यक्ष संजय मुखर्जी यांच्यासोबत 3 ऑगस्ट 2021 रोजी बैठक घेतली. या बैठकीत शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी आणि मैदानासाठी आरक्षित केलेले भूखंड सिडकोने सुशोभित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी करणारे गव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे पत्र सिडकोकडे देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याची दुरवस्था झाल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, तात्पुरत्या कामासाठी सदर 2.5 हेक्टरचा भूखंड हा ‘एमएमआरडीए’कडे देण्यात आला. शिवस्मारक आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केलेला हा भूखंड तातडीने परत मिळावा, अशी मागणी करण्याकरिता सिडकोने 6 जुलै 2020 रोजी ‘एमएमआरडीए’ला पत्र लिहिले, मात्र ‘एमएमआरडीए’ने 2 ऑगस्ट 2021 रोजी लिहिलेल्या पत्रात हे दोन्ही भूखंड सप्टेंबर 2023पर्यंत आमच्या वापरात राहातील, असे म्हटले. सप्टेंबर 2023नंतर हा भूखंड मोकळा होईल, असे ‘एमएमआरडीए’च्या या पत्रावरून स्पष्ट होते.
मात्र, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि गव्हाण ग्रामपंचायत सातत्याने पुन्हा पुन्हा सिडकोकडे मागणी करीत होतेच. दरम्यान, सिडकोचे उलवे 2 येथील कार्यकारी अभियंता यांनी सेक्टर 12मधील प्लॅाट नंबर 3 आणि 4 हे भूखंड उद्यानासाठी, खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात येत असल्याचे पत्र गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना 2 फेब्रुवारी 2022 रोजी दिले. दोन्ही भूखंडांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. खारकोपर स्टेशनसमोरील हे दोन्ही भूखंड, सेक्टर 12 मधील शिवस्मारकासाठीचा 5 हजार चौरस मीटर (0.5 हेक्टर) आणि खेळाच्या मैदानासाठीचा 20 हजार चौरस मीटर (2 हेक्टर) विकसित करण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन सिडको व्यवस्थापनाने 31 जुलै 2020 रोजी दिले आहे. याची आठवणही 4 ऑगस्ट 2020 रोजीच्या पत्राने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी करून दिली. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना खारकोपर स्टेशनसमोरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभिकरण समितीने अखेरीस, 15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रात या संपूर्ण संघर्षाची माहिती दिली आहे आणि अडीच हेक्टर जागा गव्हाण ग्रामपंचायतीला लवकरात लवकर हस्तांतरित करावी, अशी मागणी केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply