Breaking News

‘जंजिरा’मुळे अनेकांना स्वयंरोजगार

राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यामुळे अनेकांना स्वयंरोजगार मिळाला आहे. मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जग प्रसिद्ध असून हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सुमारे 22 एकर परिसरात व 22 बुरुज असलेला हा किल्ला सुमारे 450 वर्षांपूर्वी बांधलेला असून समुद्राच्या मध्यभागी असल्याने या किल्ल्याचे आकर्षण सर्व पर्यटकांना आहे. चहुबाजूने पाणी असताना सुद्धा या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याची तलावे आहेत याचेसुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरातन काळातील कलाल बागडी या सारखी सर्वात वजनी तोफ अजूनही किल्ल्यावर अस्तित्वात आहे. राणी महाल, भुयार मार्ग, घोडेखाना, उंच तापू अशी विविध ठिकाणे या किल्ल्यावर पर्यटकांना पहाता येतात.

सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यामुळे राजपुरी ग्रामपंचायतीला मोठे उत्पन्नाचे आर्थिक स्तोत्र प्राप्त झाले आहेत. या ग्रामपंचायतीतर्फे परिसरातील स्वछता पाळण्यासाठी पर्यटकांकडून स्वछता कर घेतला जातो. पर्यटकांची वाहन पार्क करण्यासाठी पार्किंग चार्जेसचे उत्पन्नसुद्धा ग्रामपंचायतीला मिळत असते. राजपुरी येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला सात लाख पर्यटक भेटी देत असतात. राजपुरी जुनी जेट्टी व नवीन जेट्टी येथून पर्यटकांना शिडाच्या बोटींमधून  जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना नेण्यात येते. जंजिरा पर्यटक जल वाहतूक सोसायटीतर्फे सदरची वाहतूक करण्यासाठी 13 शिडांच्या बोटी आहेत. राजपुरी येथील मुस्लिम समाजातील युवक या बोटींवर काम करतात. सध्या किल्ल्यावर जाण्याचे तिकीट 61 रुपये असून प्रत्येक प्रवाशामागे 10 रुपयांची लेवी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डास मिळत असते. त्यामुळे शासनालासुद्धा मोठे उत्पन्न या किल्यापासून मिळत आहे. तर बोट मालकांनासुद्धा प्रत्येक प्रवासी मागे 50 रुपये मिळाल्यामुळे येथील बहुतेक तरुण बोटीवर काम करताना दिसून येत आहेत. बोटीवर ने -आण करण्यासाठी सोसायटी असल्याने सोसायटीअंतर्गत प्रत्येक बोटींना मिळणार्‍या उत्पन्नाचा समान भाग वाटप केल्यामुळे या संस्थेत मोठा एकोपा निर्माण झाला आहे. शिडांच्या बोटीवर सुमारे 90  युवक काम करीत असून या कामामुळे त्यांच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. त्यामुळे राजपुरी येथील मुस्लिम समाज जंजिरा किल्ल्यामुळे सधन झाला आहे. 1977 पासून जंजिरा किल्ल्यावर शिडांच्या बोटीची वाहतूक करण्यात येत आहे.त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेला ठेका देण्याची पद्धत रूढ झाली तेव्हापासून जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्था ही किल्ल्यावरील वाहतूक व्यवस्था सांभाळत आहे.

याबाबत आपली भूमिका मांडताना जंजिरा जल वाहतूक पर्यटक संस्थेचे चेअरमन इस्माईल आदमने व व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ला पाहण्यासाठी लोक हजारोच्या संख्येने राजपुरी येथे येतात. वाढती गर्दी लक्षात घेता बोटींमधून जास्त पर्यटक किल्ल्यावर लवकर जाण्यासाठी व त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी जास्त संख्येने पर्यटकांना सामावून घेतले जाते. गर्दीच्या वेळी ज्यावेळी आमच्या बोटींची संख्या कमी पडत असेल तेव्हा आम्ही अतिरिक्त बोटींची व्यवस्था  करून पर्यटकांची सोय करीत असतो. परंतु पर्यटकांना जास्त वेळ उन्हात ताटकळत राहू नये म्हणू आम्ही वाहतुकीची व्यवस्थित काळजी घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक 1977 सालापासून सुरु असून एवढ्या वर्षात या ठिकाणी कोणताही अपघात घडलेला नाही. आम्ही पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेत असून उत्कृष्ट पोहणारे लोकसुद्धा आम्ही तैनात केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. आमच्या प्रत्येक बोटीमध्ये लाइफ जॅकेट आहेत. परंतु पर्यटक आपले कपडे खराब होतील म्हणून लाइफ जॅकेट घालत नाही. परंतु पुढील काळात मेरीटाइम बोर्डाच्या सूचनेप्रमाणे लाइफ जॅकेटची सक्ती करणार असल्याचे सांगण्यात आले.

जंजिरा किल्ला पहाण्यास येणारे पर्यटक जेट्टीवर जाताना विविध दुकानातून जात असल्याने येथे असणार्‍या प्रत्येक घटकाचा धंदा करून जात असतात. येथे विविध टोप्या, गॉगल्स, सरबतची दुकाने, शहाळी विक्रेते, आइस्क्रिम विक्रेते अशा विविध दुकानाचा गल्ला मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे येथील तरुणांनासुद्धा स्वयंरोजगारसुद्धा प्राप्त झाला आहे.एका किल्ल्यामुळे येथील स्थानिक लोकांना स्वयंरोजगार मिळून आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. एका जंजिरा किल्ल्यामुळे येथील स्थायिक लोकांना रोजगार मिळून राहणीमानाचा दर्जा बदलला आहे. लोक आर्थिक उन्नत्ती साधून सर्व लोक सुखी झाले आहेत.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply