Breaking News

जांभूळवाडीसाठी नळयोजना राबवणार

वारे सरपंच योगेश राणे यांचे प्रयत्न; महिला हालातून मुक्त होणार

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील जांभूळवाडीमधील महिलांना साधारण 800 मीटर अंतर डोंगर उतरून पाणी नेण्यासाठी यावे लागत होते. मात्र आता डोंगराच्या खाली असलेल्या विहिरीमध्ये वीज पंप लावून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच योगेश राणे यांनी दिली.

जांभूळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असून ते पाणी वीजपंप लावून वाडीमध्ये नेल्यास महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. विहिरीचे पाणी वाडीमध्ये नेण्यासाठी नवीन वीज जोडणी देण्याची कार्यवाही सुरु केली असल्याची माहितीसरपंच योगेश राणे यांनी दिली. जांभूळवाडी ही आदिवासीवाडी एका डोंगरावर वसली आहे. त्या वाडीत जाण्यासाठी असलेल्या रस्त्याने शेवटचे वळण चढताना अनेकांची दमछाक होते. अशा या वाडीमधील महिलांना पिण्याचे पाणी नेण्यासाठी पायथ्याशी असलेल्या दोन विहिरींवर यावे लागते. वाडीतून खाली पाण्यासाठी उतरताना महिलांच्या हातात रिकामे हांडे असतात. मात्र पाण्याने भरलेले हांडे पुन्हा वाडीमध्ये घेऊन जाताना महिलांची मोठी दमछाक झालेली दिसून येते.

जांभूळवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नाल्याच्या बाजूला दोन विहिरी जांभूळवाडी ग्रामस्थांच्यासाठी जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाने बांधल्या आहेत. त्यातील दोन्ही विहिरीमध्ये पाणी असून विहिरीजवळ विजेचे खांबदेखील आहेत. मात्र त्या विहिरीतून पाणी वाडीत नेण्यासाठी नळपाणी योजना राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, मात्र या मागणीचा विचार होत नव्हता. सरपंच योगेश राणे यांनी मात्र या मागणीकडे लक्ष देऊन जांभुळवाडीसाठी नळयोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जांभूळवाडीसह अन्य आदिवासी वाड्यात थेट नळाचे पाणी पोहचावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यावेळी जांभूळवाडीसाठी विहिरीतून पाणी वाडीत नेण्याचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच परवानगी येईल आणि लवकरच आम्ही जांभूळवाडीमध्ये पाणी नेऊ.

-योगेश राणे, सरपंच, वारे ग्रामपंचायत

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply