कर्मठ विचारांची संघटना अशी सर्वसाधारण ओळख काल-परवापर्यंत असलेली ही संघटना आज नव्या उमेदीच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेली दिसते. संघाचा हिंदुत्वाचा विचार काहींना वरकरणी टोकाचा वाटत असेल कदाचित, परंतु त्यांच्याशी जोडले गेल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणार्या कित्येकांना अत्यंत निष्ठापूर्वक रीतीने देशासाठी काम करत राहण्याची त्यांची वृत्ती भावते. त्यामुळेच तरुणांसाठीच्या संघाच्या शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून हजेरी लावणार्यांची संख्या वाढते आहे.
अर्ध्या चड्डीतले म्हणून ज्यांची काल-परवापर्यंत सगळेच खिल्ली उडवत होते, त्या संघ स्वयंसेवकांच्या शिस्त आणि चिकाटीचे कौतुक गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अफाट यशाचा हा महिमा आहे. ‘भाजपला मत द्या’ असे कुठलाच संघ कार्यकर्ता कधीही कुणाला सांगत नाही असे म्हटले जाते. परंतु तरीही भाजपच्या यशाच्या मुळाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळात चिकाटीने केलेला जनसंपर्क आणि आपल्या विशिष्ट वैचारिक तत्त्वज्ञानाचा प्रचार आहे हे सारेच मान्य करतात. महाविद्यालयीन शिक्षणानंतर लागलीच आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत मिळालेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, परदेशवार्या असे तमाम भारतीयांना हवेहवेसे वाटणारे सारे काही प्राप्त झालेले असताना त्याकडे पाठ फिरवून काही तरुण आज मायदेशी परतत आहेत. असे मायदेशी परतलेले तरुण असोत किंवा इथेच राहून आयटी कंपनीत काम करता-करता सामाजिक कामाच्या ओढीतून संघाशी जोडले गेलेले अनेक सुशिक्षित तरुण आज संघाच्या शाखांमध्ये हजेरी लावताना आढळतात. आपण आपल्या संस्कृतीला, धार्मिक श्रद्धांना जपले पाहिजे या धारणेतून काही जण संघाकडे वळत आहेत तर काही जण निव्वळ सामाजिक कामाच्या ओढीतून संघाशी बांधले जात आहेत. आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी वेगळी शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यांच्या व्यावसायिक जबाबदार्या सांभाळून त्यांना संघाच्या कामकाजात सहभागी होता येईल याची दक्षताही घेतली जाते. या अशा वार्षिक शिबिरांमध्ये सोयीसवलतींचा कुठलाही बडेजाव नसतो. स्वयंसेवक स्वत:च्या राहण्या-खाण्याचा, प्रवासाचा खर्च स्वत: करतात. तात्पुरत्या निवासी व्यवस्थेत राहतात. शिबिराच्या काळात त्यांचा कुटुंबीय, मित्रपरिवाराशी कुठलाही संपर्क नसतो. याच काळात त्यांच्या मनावर संघाच्या विचारसरणीचे संस्कार केले जातात. राजकीय कारकीर्द करण्यासाठी म्हणून स्वयंसेवक काम करीत नाहीत किंबहुना भाजपमध्ये पाय रोवण्याचाही हा मार्ग नव्हे, असे संघाचे पदाधिकारी ठामपणाने सांगतात. संघातील काही व्यक्ती पुढे राजकारणात गेल्याही असतील. परंतु बहुसंख्य स्वयंसेवक हे आपापल्या क्षेत्रात काम करताना संघाकरिता संबंधित कामकाज करीत राहतात. निवडणुका आणि संबंधित राजकारणापासून संघ अंतर राखून आहे. अर्थात तरीही भाजपमधील अनेकांची संघाशी नाळ जोडलेली असते हे नाकारता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे तर भाजप हा संसदीय लोकशाहीतील एक राजकीय पक्ष. परंतु या दोन्ही संघटनांचा विचार एकमेकांना वगळून करता येणार नाही, हे खरेच आहे.