पदाधिकार्यांनी घेतली डॉ. बनसोडे यांची भेट

कडाव ः वार्ताहर
कर्जतमधील आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार व रुग्णसेवेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आरोग्य यंत्रणेचा संतोष पवारसारखा एक अभ्यासू पत्रकार बळी ठरल्याचे समोर आले आहे. या पाशर्वभूमीवर कर्जत भाजपने आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्यासाठी थेट कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बनसोडे यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात आरोग्य यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, प्रदेश युवा मोर्चा सचिव हृषीकेश जोशी, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष किरण ठाकरे, प्रकाश पेमारे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आम्ही एका सेवाभावी वृत्तीने काम करणार्या व्यक्तिमत्त्वाला गमावले असून यापुढे अशी घटना आपल्या विभागाच्या चुकीमुळे व हलगर्जीपणामुळे तालुक्यात घडू नये. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांची स्थितीही उत्तम आहे, मात्र आपल्या विभागातून ज्या काही त्रुटी समोर येत आहेत त्या रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत. अजून किती दिवस असा ढिसाळ कारभार चालणार? हे सर्व तत्काळ थांबले पाहिजे तरच येथे येणारा रुग्ण सुरक्षित राहील, अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडतच राहतील. यापुढील काळात या सर्व आरोग्य यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात भाजप कुठेही कमी पडणार नाही, अशी रोखठोक चर्चा डॉ. बनसोडे यांच्याशी या वेळी झाली.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचार्यांच्या एका चुकीमुळे मोठा अनर्थ घडला. परिणामी कधीही भरून न निघणारी मोठी हानी झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
-मंगेश म्हसकर, तालुकाध्यक्ष, कर्जत भाजप