Breaking News

माथेरानची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल

कर्जत : बातमीदार

कोविड हद्दपार करण्यासाठी माथेरान नगर परिषदेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत पहिली मात्रा 99 टक्के पूर्ण झाली असून दुसरी मात्राही 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहे.

पर्यटनस्थळ असल्यामुळे माथेरानला लाखो पर्यटक भेट देत असतात. इथे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून माथेरान नगर परिषदेने कंबर कसली असून वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करून लसीकरण करण्यासाठी आग्रह धरला जात आहे. आतापर्यंत माथेरानमधील 3838 नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली असून 2147 नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 

मिशन कवच कुंडल अंतर्गत जे नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी येथील बी. जे. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील सुशिक्षित नागरिक हे घरोघरी जाऊन लसीकरण करीत आहेत. तसेच लसीकरणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि शाळेतील शिक्षकांचीदेखील मदत घेतली जात आहे. यामुळे 100 टक्के लसीकरणाकडे माथेरानची वाटचाल सुरू आहे.

पर्यटनस्थळ असल्याने  स्थानिकांच्या लसीकरणासाठी माथेरान नगर परिषदेने प्राधान्य दिले आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यात राहिलेल्या 30 टक्के नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाईल. 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी माथेरान ही रायगड जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असेल.

-सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply