Breaking News

नवी मुंबई मेट्रो : मार्ग 2, 3च्या डीपीआरला सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको संचालक मंडळाच्या 18 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3  यांच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. मे. राईटस  लि. यांनी या मार्गांसाठीचा डीपीआर तयार करून तो सिडकोस सादर केला होता. मार्ग क्र. 4 च्या उभारणीबाबत पुढील मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार नियोजन करण्यात येईल.

नवी मुंबईतील नोड् एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जोडले जावेत व येथील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासाचा जलद पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये उन्नत रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

नवी मंबई मेट्रो प्रकल्पात एकूण 4 मार्ग प्रस्तावित असून त्यांपैकी मार्ग क्र. 1- बेलापूर ते पेंधर (11 किमी) वरील कामे प्रगतीपथावर आहेत. तर मार्ग क्र. 2- खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी (7.12 किमी), मार्ग क्र. 3- पेंधर ते तळोजा एमआयडीसी (3.87 किमी) आणि मार्ग क्र. 4- खांदेश्वर ते नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळ (4.17 किमी) यांकरिता डीपीआर तयार करण्याचे काम मे. राईटस लि. यांना देण्यात आले होते.

सदर मार्गांसाठी डीपीआर तयार करताना नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधी तसेच हे मार्ग नमुंआंविला जोडले जाणे या प्रमुख बाबींचा विचार करण्यात आला होता. या डीपीआरमध्ये या मार्गांच्या उभारणीकरिता येणारा खर्च, कार्यान्वयन व देखभाल खर्च, वित्त पुरवठ्याचे पर्याय, मेट्रो मार्गांची लांबी, स्थानकांची संख्या यांसह अन्य तांत्रिक बाबींचा समावेश आहे. त्यानुसार सदर मेट्रो मार्ग क्र. 2, 3 आणि 4 यांकरिता अनुक्रमे रु. 2820.20 कोटी, रु. 1750.14 कोटी व रु. 1270.17 कोटी इतका खर्च अंदाजित आहे.

सदर डीपीआरमध्ये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची अमंलबजावणी विशेष वाहन हेतू (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करून करणे; प्रकल्पाशी संबंधित नियोजन, निविदा तयार करणे, कंत्राट देणे, कंत्राटदारांवर देखरेख करणे, विविध यंत्रणांशी समन्वय साधणे इ. विविध बाबी हातळण्यासाठी विशेष वाहन हेतू कंपनी आणि त्या अंतर्गत नेमलेले ‘सर्वसाधारण सल्लागार’ अशी द्विस्तरीय रचना; जमीन संपादन, पुनर्वसन यांसारखे महत्त्वाचे विषय हातळण्याकरिता मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करणे; शासनाकडून अपेक्षित आर्थिक सवलती इ. महत्त्वाच्या शिफारसी या डीपीआरमध्ये करण्यात आल्या आहेत.

उपरोक्त मेट्रो मार्ग क्र. 2 व 3 करिता मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या भागभांडवल प्रणालीनुसार (फंडिंग पॅटर्न) विशेष वाहन हेतू कंपनी अंतर्गत 20% भागभांडवल केंद्र शासनाकडून तसेच 20% भागभांडवल राज्य शासनाकडून उभारण्यात येईल. मेट्रो मार्ग क्र. 2 करीता उर्वरित 60% भागभांडवल सिडकोतर्फे उभारण्यात येईल. मेट्रो मार्ग क्र. 3 करीता उर्वरित 60% भागभांडवलापैकी एमआयडीसी आणि सिडको उभयतांकडून योग्य तो वाटा (प्रपोर्शनेट कॉस्ट शेअरिंग) उचलण्यात यावा याकरिता सिडको व एमआयडीसी यांमध्ये चर्चा होऊन याबाबत एमआयडीसीने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply