Breaking News

गोमांसाची वाहतूक करणार्या दोघांना अटक

मुरुड : प्रतिनिधी

मोटारसायकलवरून गोमांस विकण्यासाठी चाललेल्या विहूर येथील एका इसमास मुरुड पोलिसांनी बुधवारी (दि. 20) अटक केली असून, त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मनानं पांगारकर असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, जावेद वाळवटकर असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनानं पांगारकर हा त्याच्या मोटारसायकल (एमएच-06,बीआर-0519)वरुन गोमांस विकण्यास विहूर येथून मुरुडकडे जात आहे, अशी खबर मिळताच ठाणे अंमलदार सचिन वाणी यांनी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या चेक पोस्टवर बुधवारी रात्री कसून तपासणी सुरू केली. या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या मनानं पांगारकरकडे 20 प्लास्टिक पिशव्यांत एक-एक किलो मांस आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता सदर कृत्यात जावेद वाळवटकर हा इसम सामील असल्याचे पांगारकर याने सांगितले. या प्रकरणी मनानं पांगारकर आणि जावेद वाळवटकर यांच्या विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना पकडण्यात यश आले असून, गुन्हा सिध्द झाल्यास आरोपींना पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास सात वर्षे सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. राजन गौरीशंकर चौधरी असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.पनवेल तालुक्यातील कामोठे येथे 1 एप्रिल 2014 रोजी सदर घटना घडली होती. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376, 354, 506, तर पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 3,4,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने इयत्ता तिसरीत असलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयासमोर दोषारोपपत्र दाखल केले होते.सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी अभियोक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण 10 जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात पीडित मुलगी, फिर्यादी, तपासी अंमलदार तथा वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी राजन चौधरी यास बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आणि त्याला पाच हजार रुपये दंड व सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply