सर्वसाधारणपणे दहावीच्या निकालांत विज्ञान किंवा गणितामुळे विद्यार्थी नापास झालेले आढळून येत. यंदा मात्र मराठी प्रथम भाषा, मराठी द्वितीय भाषा, इंग्रजी प्रथम भाषा तसेच द्वितीय, तृतीय भाषेचाही निकाल प्रचंड घसरला आहे. अनेकांची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झालेली नाही. हे असे किती विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे त्याचा तपशीलात अभ्यास होण्याची गरज आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदा मोठी घसरण झाली आहे. ही घसरण मुंबई विभागासह संपूर्ण राज्यभरात दिसून आली, त्यामुळेच त्याबद्दल तपशीलात जाऊन विचार केला जाण्याची गरज आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांची करिअरची दिशा ठरवणारा पहिला टप्पा असल्यामुळे त्याला समाजात प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनावर, आयुष्यावर मोठा परिणाम करणारी अशी ही परीक्षा ठरते. यंदा राज्यात दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 75.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागात यंदा 74.9 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विभागात ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचाही समावेश होतो. मागच्या वर्षी मुंबई विभागात 85.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते तर राज्यात 86.43 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. निकालातील ही इतकी प्रचंड घट कशामुळे झाली असावी याची कारणमीमांसा करताना नवीन अभ्यासक्रम, बदललेला पेपरपॅटर्न तसेच भाषा विषयांची 20 गुणांची तोंडी परीक्षा रद्द झाल्याने बंद झालेली गुणांची खैरात यांकडे बोट दाखवले जात आहे. स्वत: शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील कमी निकाल म्हणजे वाढलेल्या गुणांची सूज कमी झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 2007पर्यंत 20 मार्कांचे अंतर्गत गुण देण्याची पद्धत नव्हती. 2008 पासून अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 गुण देण्याची पद्धत सुरू झाली. ही पद्धत 2018 पर्यंत सुरू होती. 2007 मध्ये अंतर्गत गुण नसताना शालांत परीक्षेचा निकाल 78 टक्के लागला होता आणि हे गुण देण्याची पद्धत सुरू झाल्यावर 2008 मध्ये 87.41 टक्के निकाल लागला. म्हणजे या गुणांमुळे निकालात 9 टक्के वाढ झाली होती. आता यावर्षी हे अंतर्गत गुणदान बंद केल्यानंतर निकालात मोठी घट झाली आहे, याकडे शिक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय बोर्डांच्या निकालात 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असतानाच राज्य मंडळाचा निकाल घसरल्याने अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेवर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते आहे. अर्थात, केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या अद्यापही बरीच कमी असल्याचा प्रतिवाद त्यासंदर्भात केला जातो. परंतु मुळातच आपल्याकडे राज्य मंडळापेक्षा सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय बोर्डांकडे वळण्याचा पालकांचा कल वाढतो आहे. मराठी भाषा शिकण्याच्या सक्तीपासून सुटका करून घेण्यासाठीही अनेक अन्य भाषिक या मंडळांना प्राधान्य देतात. अशात राज्य मंडळाच्या परीक्षेत भाषा विषयच विद्यार्थ्यांना दगा देऊ लागल्यास निश्चितच केंद्रीय बोर्डांकडे वळण्याचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांचे भवितव्य तसेच राज्य मंडळाकडे विद्यार्थी टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेही निकालातील ही घट नेमकी कशामुळे याचा खोलात जाऊन विचार होण्याची व त्यावर योग्य ती पावले उचलली जाण्याची गरज दिसते आहे.