Breaking News

एक कोटीची ‘तलाश’ शून्यावरच बाद

तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 1970च्या जानेवारी महिन्यात गिरगावातील चाळीतील मध्यमवर्गाच्या एकत्र कुटुंब पद्धतीत (आजी, आजोबा, पती, पत्नी व तीन लहान मुले) कुटुंब प्रमुखाला महिन्याला किती रुपये पगार चांगले सुख देणारा होता असे तुम्हाला वाटते? एक लक्षात घ्या, घरात मनोरंजनासाठी फक्त छोटासा ट्रान्झिस्टर आहे (बटनाने कमी, पण फटका मारल्यावर तो चांगला चालतो), तोपर्यंत दूरचित्रवाणी हा शब्दच माहीत नव्हता. त्यामुळे त्याची गरज नव्हतीच. घरात लॅण्डलाईन फोन, एअर कंडिशनर, फ्रीज, मिक्सर, ज्यूसर, गिझर, वॉशिंग मशीन या चैनीच्या वस्तू गरजेच्या नव्हत्या. संपूर्ण दोन-तीन चाळीत एक फोन भारी वाटे. जेवणासाठी हॉटेलमध्ये जायचे असते हा विचारही मनात येत नसे. महिन्यातून एकदा मॅजेस्टीक थिएटरमध्ये स्टॉलचे पासष्ट पैशांचे तिकीट काढून मराठी चित्रपट घरचा डबा घेऊन जाऊन सहकुटुंब पाहिला जात असे…
या सगळ्याची गोळाबेरीज महिना तीनशे-साडेतीनशे रुपयांत छान जमून जाई. (तुमच्या कुटुंबात, नात्यात कोणी सत्तरीपार वयाचे असल्यास हवं तर त्यांना विचारा याबाबत) अशा आर्थिक स्थैर्याच्या काळात एखाद्या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट तब्बल एक कोटी? त्याच सुमारास कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट मराठी चित्रपट लाख सव्वा लाखात बने. हिंदी चित्रपटही पंचवीस=तीस लाखांत निर्माण होई. एखादा ’मेरा नाम जोकर’ (1970) अपवाद. त्यातही राज कपूरचा मंत्र असे पिक्चर दिलसे बनती है, पैसेसे नही. त्या काळात ’पै पै मोजूनमापून अथवा वाचवून नि वाढवूनही चित्रपट निर्मिती होत नसे. पब्लिकला झक्कास मनोरंजन द्यायचे, गीत संगीत व नृत्य भारी असावे अशीच हिंदी चित्रपट निर्मितीमागची भावना असे.
अशातच अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक ओ. पी. रल्हन आपण ’एक कोटी खर्चाचा चित्रपट तलाश’ची निर्मिती केली आहे, असं पिक्चरचं शूटिंग संपल्या संपल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत जोरशोरसे सांगू लागताच चित्रपट रसिकांच्या भुवया उंचावणारच. समाजाच्या सर्वच स्तरात नातेसंबंधाची वीण घट्ट असल्याचा तो काळ होता. जगण्यासाठी पैसा हा फक्त आधार आहे, त्यासाठी अचाट, अफाट संपत्तीची भूक नाही असे मानले जात असतानाच ’एक कोटीचा पिक्चर’ असे विविध भारतावरील रेडिओ प्रोग्राममधून कानावर (’तलाश कहानी है उस लडकी की जिसे जिंदगी मे तलाश थी’ असं या पिक्चरच्या रेडिओ प्रोग्राममध्ये डायलॉग होता हे आठवतेय), रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबावरील पोस्टरवर, मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या होर्डींग्सवर सतत दिसू लागल्यावर ’एक कोटीचा आकडा’ जरा जास्तच मोठा वाटू लागला. त्या काळात मध्यमवर्गीयांच्या घरात नट-नट्यांची लफडी कुलंगडी चवीचवीने प्रसिद्ध करीत असलेल्या ग्लॉसी पेपरवरील गॉसिप्स मॅगझिनना प्रवेश नसे. सकाळी घरात येणारे वृत्तपत्र आणि वाचनालयातून आणले जाणारे पुस्तक वा साप्ताहिकातून ’पिक्चरच्या जगात’ काय काय चाललंय ते समजायचं आणि ते पुरेसेही असे. अशातच ’एक कोटीचा पिक्चर’ हे जरा अतीच वाटायचं. खरंतर पिक्चर किती रुपयांत बनतो आणि मग निर्माता त्यावर किती कमावतो असे आर्थिक प्रश्न त्या काळातील चित्रपट रसिकांच्या मनात येत नसत. पिक्चर आवडला तर डोक्यात घ्यायचा नि ठेवायचा आणि पडद्यावर न ठेवता डोक्यावर घ्यायचा एवढचं ठावूक असल्याचे ते दिवस होते.
राजेंद्रकुमार ज्युबिलीकुमार म्हणून ओळखला जात होता तरी याच दिवसांत राजेश खन्नाचे पिक्चर पडद्यावर येत ते ज्युबिली हिट व्हायला. त्याची फेव्हरेट नायिका शर्मिला टागोरचे एक मोठे स्वप्न पूर्ण होत होते. देव आनंद (यह गुलिस्ता हमारा), दिलीपकुमार (दास्तान) आणि आता राजेंद्रकुमार (तलाश) यांची नायिका व्हायचं तिचं मोठे स्वप्न पूर्ण होत होते. तेदेखील डबल रोलने. न इव्हिनिंग इन पॅरिस, यह रात फिर न आयेगी या चित्रपटात तिने तत्पूर्वीच (आणि मग ’मेरे हमसफर’, ’राजा रानी’, ’दो शत्रू’, ’बेशरम’, ’मौसम’ इत्यादीत) तिचा डबल रोल. ’तलाश’मध्ये शहरी व ग्रामीण अशी दुहेरी भूमिका. चित्रपटात राजेंद्रकुमार व शर्मिला टागोर यांसह बलराज साहनी, ओ. पी. रल्हन, हेलन, सुलोचनादिदी, मदन पुरी, सप्रू, टूनटून इत्यादींच्या भूमिका. एका दृश्यात राजेंद्रकुमार ओ. पी. रल्हनला म्हणतो, काम पे दिल नहीं लगता, बॉस ने मुझे वार्निंग दी थी… यावर ओ. पी. रल्हन म्हणतो, वार्निंग नहीं तो क्या डार्लिंग देगा?
पिक्चरची भट्टी काही जमली नाही. प्रेमकथाच होती. गाणी मात्र एकदम सरस. मजरुह यांच्या गीतांना सचिन देव बर्मनचे संगीत. पलकों के पिछे तू ने (मोहम्मद रफी व लता मंगेशकर), कर ले प्यार (आशा भोसले), तेरे नैना तलाश कर ले (मन्ना डे), कितनी अकेली (लता मंगेशकर), आज को जुनली रात मा (लता मंगेशकर व मोहम्मद रफी) अशी अविट गोडीची छान गाणी ही अतिशय मोठी जमेची बाजू. त्यातही आज को जुनली… गाण्याबद्दल एक खास गोष्ट. त्यातील डान्सरमध्ये सुषमा शिरोमणी आहे म्हटलं. भुवया उंचावल्या ना? साठच्या दशकात शालेय वयातच सुषमाने चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका साकारणे, नृत्य गीतात सहभागी असणे याला सुरुवात केली आणि त्याच मेहनती वाटचालीत या नृत्य गीतात तिला संधी मिळाली.
ओ. पी. रल्हन चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वी रेल्वे स्टेशनवर पेपर विकायचा. पन्नास-साठच्या दशकात हिंदी चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका साकारत असतानाच दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी सुरू केली. अतिशय धडपड्या, बडबड्या. त्यातूनच ’मुजरीम’ (1958)पासून त्याने दिग्दर्शनात पाऊल टाकले. यात शम्मी कपूर, गीता बाली, रागिणी, शुभा खोटे यांच्या प्रमुख भूमिका. त्यानंतर गहरा दाग (1963. राजेंद्रकुमार व माला सिन्हा), फूल और पत्थर (1966. मीनाकुमारी व धर्मेंद्र), यानंतर मोठीच उडी घेऊन ’तलाश’ आणि त्यानंतर ’हलचल’ (1971), ‘बंधे हाथ’ (1973), ’पापी ’ (1977) व ’प्यास ’ (1982) या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन. धर्मेंद्रला ’फूल और पत्थर’च्या खणखणीत यशाने पहिला व्यावसायिक आधार मिळाला. मुख्य प्रवाहातील नायकाने उघड्या निधड्या छातीने दृश्य देणे तेव्हा मोठेच धाडसाचे. धर्मेंद्रच्या दणकेबाज प्रकृतीला ते शोभले आणि त्याच्या ’ही मॅन’ इमेजचा जणू पाया रचला गेला. (तो 1973 साली ’यादों की बारात’च्या यशाने घट्ट झाला.) असं असलं तरी ’फूल और पत्थर’च्या निर्मितीच्या काळात त्याचं व रल्हनचे संबंध बिघडले होते आणि अनेक वर्षांनंतर याच ओम प्रकाश रल्हनला श्रद्धांजली म्हणून वांद्य्रातील एका चौकाचे धर्मेंद्रच्या हस्ते नामकरण करण्यात आले. राजेंद्रकुमार व रल्हन खूपच जुने मित्र आणि कालांतराने रल्हनच्या बहिणीशी राजेंद्रकुमारचे
लग्न झाले.
’तलाश’ एक कोटींत निर्माण झाला याची प्रचंड हवा निर्माण झाली. 9 जानेवारी 1970 रोजी मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. मुख्य चित्रपटगृह अप्सरामधील फर्स्ट शोपासूनच पब्लिकचा रिपोर्ट ’बकवास है’ असा आला आणि पिक्चर पडला. श्रवणीय गाणीही पिक्चरला वाचवू शकली नाहीत…आणि तुम्हालाही माहित्येय, फ्लॉप पिक्चरची यथेच्छ टवाळी होते. कोणी म्हटलं, रल्हनची श (म्हणजेच राख), तर कोणी आणखी काही म्हटलं.
बराच काळ मग कोणी फिल्मवाल्याने ’पिक्चरच्या बजेटचा आकडा’ पूर्वप्रसिद्धीत आणला नाही, खेळवला नाही. पिक्चरच्या अपयशाचा तो प्रचंड मोठा धक्का होता.
तब्बल दशकभरात कोणी काही म्हटलं नाही, कारण किती रुपयांत पिक्चर बनवला यापेक्षा त्यात काय दाखवलं ते बघू देत असा थेट
मामला होता आणि मग 1980 साली जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शान’ आला. तेव्हा त्याच्या खर्चिक स्टाईलीश जाहिरातीत म्हटलं, ’सहा कोटींचा पिक्चर शान’…
दहा वर्षांत सहापट आकडा.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply