Breaking News

बीएसएनएलचा सुटलेला तोल

रायगड जिल्ह्यात भारत दूरसंचार निगमच्या टेलिफोन शिवाय कोणताही पर्याय नव्हता अशी स्थिती होती. पुढे खासगी कंपन्या आल्या आणि बीएसएनएलला प्रतिस्पर्धी निर्माण झाला असून आजची स्थिती रायगड जिल्ह्यातील दूरसंचार सेवा पार कोलमडून गेली आहे. बीएसएनएलचा व्यवहार गेल्या काही दिवसात ढासळला असून त्यात रस्त्यांची सुरू असलेली कामे लक्षात घेता बीएसएनएल कायम नॉट रिचेबल बनला आहे.त्यामुळे बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून व्यापारी वर्ग पाठोपाठ सामान्य जनतादेखील ठप्प बीएसएनएलमुळे हैराण झाली असून भारत दूरसंचार निगमचे खासगीकरण केल्याशिवाय पर्याय उरला नाही असे दिसून येत आहे.

25 वर्षांपूर्वी भारत दूरसंचार निगमचे टेलिफोन अनेकांचे घरात वाजले की त्या घरांची श्रीमंती ठासून उठायची. पण जसे जसे खासगीकरण सुरू झाले तसे प्रत्येकाचे हातात मोबाईल फोन दिसू लागले. या सर्व बदलाच्या वार्‍यात भारत दूरसंचार निगम ही सरकारी कंपनी खासगी कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही हे दिसून आले आहे. त्यात बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्याने सरकारी यंत्रणा आणि बँका यांना ब्रॉड कास्टिंगची सेवा वापरणे बंधनकारक असल्याने सरकारी यंत्रणा ही सरकारचे अधिपत्य असलेल्या बीएसएनएलकडे आहे.पण गेली काही महिन्यात रायगड जिल्ह्यात बीएसएनएलचे जाळे हे विस्कटलेले दिसून येत आहे.त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार हे सातत्याने बंद पडलेले असलेले जनतेने अनुभवले आहे. त्यात सरकारी कार्यालयात देखील बीएसएनएलच्या यंत्रणेशिवाय दुसरी कोणतीही यंत्रणा नाही.त्यामुळे सरकारी कार्यालयात असलेली ही भारत दूरसंचार सेवा ही सतत बंद असल्याने जनतेच्या शासकीय कार्यालयात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. यामागे काही खासगी कंपन्याचे लागेबांधे आहेत का? याचा विचार होण्याची गरज आहे. कारण घरात असलेल्या टेलिफोन शिवाय दुसरा पर्याय नसताना आता हाता हातात मोबाईल दिसून आल्याने केबल ओढून घरात पोहचलेले टेलिफोन सतत बंद असायचे, त्यातून त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले आणि त्यांनी बीएसएनएलला बाय बाय करण्यास सुरुवात केली आणि आज फार कमी लोकांकडे बीएसएनएलचे कार्ड असलेले मोबाईलधारक यांनी आपले नेटवर्क बदली केले आहे.आज नवीन वर्गाला बीएसएनएल काय हे माहीत नाही अशी स्थिती शासनाच्या हातातील ही कंपनी आज व्यवस्थित सेवा देताना दिसत नाही. त्यामुळे ग्राहक आपले नेटवर्क बदलू लागल्याने बीएसएनएलचे दिवाळे वाजले असून खासगी मोबाईल कंपनीच्या स्पर्धेत ग्राहकच मिळत नाही, अशी भारत दूरसंचार निगमची अवस्था झाली आहे.

बीएसएनएलचे कामकाज दिवसेंदिवस कमी होण्याचे प्रमाण बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांचे समाधान करू शकत नसल्याने भारत दूरसंचार निगमचे दिवाळे वाजले असल्याचे दिसून आले आहे. टेलिफोन बंद पडला असल्याच्या अनेक तक्रारी करून देखील कोणी काही त्याकडे पाहत नव्हते. त्यामुळे ग्राहक हे बीएसएनएलला कंटाळून खासगी कंपनीकडे आकृष्ट झाले आहेत, ते कितीही नवीन योजना देऊन देखील आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होत नसल्याने ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी बीएसएनएलचे खासगीकरण करण्याची मागणी पुढे येत आहे. पण भारत दूरसंचारसारख्या सरकारच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीची अशी अवस्था होण्याचे कारण काय? याचा विचार ना बीएसएनएल करताना दिसत आहे, ना शासन करताना दिसत आहे. आपले काय चुकले याचा विचार न करणारी बीएसएनएल ही सेवा देणारी कंपनी आज सेवा देण्याऐवजी आपल्या ग्राहकांना संकटात टाकण्याचे काम करताना दिसत आहे. आता प्रत्येकाचे हातात मोबाईल फोन आले असून नेटवर्क नसले की सर्व परेशान होतात असे असताना मोबाईल ही सर्वांची गरज बनलेली असताना आपल्याकडे असलेले ग्राहकांचे जाळे बीएसएनएल का टिकवून ठेवत नाही? याचे गणित आज कोणालाही सोडविता येत नाही. मात्र सामान्य जनतेला देखील त्यात काही तरी षड्यंत्र असल्याचे वाटत असून बीएसएनएल बंद करून देशाचे आर्थिक व्यवहार करणारी दूरसंचार यंत्रणेची चावी खासगी कंपनीच्या हातात देण्याचा डाव तर नाही ना? असा देखील प्रश्न उपस्थित होत असून तक्रारीकडे सतत दुर्लक्ष करण्याचे बीएसएनएलचे प्रमाण पाहता सरकारच्या या कंपनीकडे दुर्लक्ष कायम असल्याचे सिद्ध होत आहे आणि जे सर्व जाणीवपूर्वक होत आहे काय? असा संशय देखील व्यक्त होत आहे.

सामान्य माणसांपासून गर्भश्रीमंत यांना सर्वांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत जावे लागते आणि बँकांचे सर्व व्यवहार ऑनलाइन झाल्याने बीएसएनएलची सेवा कोलमडली की बँकांचे आर्थिक व्यवहार देखील बिघडतात. गेल्या अनेक महिन्यात बीएसएनएलचे व्यवहार ठप्प झाल्याने बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे बँकांच्या आर्थिक उलाढालीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे सामान्य जनतेपासून श्रीमंत आणि आर्थिक जगत यांना देखील दूरसंचार सेवेअभावी बँकांचे व्यवहार कोलमडले की त्याचा फटका सर्वांना बसत आहे हे स्पष्ट झाले असून बँकांबरोबर ग्राहकांचे देखील त्यात नुकसान झालेले दिसून येत आहे. शासकीय कार्यालये यांच्या ठिकाणी देखील भारत दूरसंचार निगमशिवाय अन्य कोणतेही नेटवर्क वापरले जात नाही. टेलिफोन, शासकीय योजना यांचा सर्व व्यवहार हा भारत दूरसंचार निगम कडून होत असून गेली काही वर्षे बीएसएनएलकडून त्या अडचणींवर मात करण्यासाठी कोणतेही प्रकारची उपाययोजना करताना सरकार दिसत नाही. त्यामुळे नेटवर्क गेले की मग सर्व व्यवहार ठप्प अशी स्थिती सरकारी कार्यालये आणि बँकांच्या व्यवहाराची झाली आहे.काही ठिकाणी तर सातत्याने बीएसएनएल ठप्प होत असल्याने दोन दोन आठवडे व्यवहार ठप्प होऊन ग्राहकांचे होणारे नुकसान पाहून संतप्त ग्राहकांनी बँकांना टाळे लावण्याच्या घटना देखील जिल्ह्याच्या अनेक भागात घडल्या आहेत.

बँकांची नेटवर्क बंद पडले की रस्त्यांची कामे सुरू आहेत, अशी कारणे भारत दूरसंचार निगम कडून दिली जातात. केबलचे जाळे विणले जात असताना भविष्यात त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण होणार आहे याची कल्पना असताना देखील भारत दूरसंचार निगम रस्त्याच्या अगदी कडेला केबल टाकून देतात आणि आपली जबाबदारी संपवतात. मात्र कालांतराने रस्त्याची कामे केली जातात आणि त्या रुंदीकरणात बीएसएनएलच्या केबलचे तुकडे तुकडे होतात आणि परिणामी बँका, शासकीय यंत्रणा यांच्याकडे असलेले नेटवर्क गायब होते आणि व्यवहार ठप्प होतात? हे सातत्याने का घडते किंवा ते जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे? याचा अभ्यास शासनाने करण्याची गरज आहे. त्याबाबत अभ्यास करण्याची तयारी बीएसएनएल करीत नसल्याने त्यांना आपली नौका बुडावयाची आहे असा सरळ सरळ अर्थ निघत आहे. या कंपनीकडून रस्त्याच्या कामांमुळे केबल तुटतात आणि आपली सेवा खंडित होत असल्याच्या पोस्ट बीएसएनएलचे अधिकारी ग्राहकांना सांगत आहेत. मात्र ज्या रस्त्याच्या कडेला बीएसएनएलच्या केबल आहे, अगदी त्यांच्या बाजूला देशात दूरसंचारचे जाळे विणत असलेल्या एका दूरसंचार कंपनीच्या केबल टाकल्या जात आहेत. मात्र त्या खासगी कंपनीच्या केबल या तुटत नाहीत मग बीएसएनएलच्या केबल का तुटतात? याचे उत्तर साधे सोपे असून देखील बीएसएनएल मूग गिळून गप्प आहे. याचा साधा अर्थ म्हणजे बीएसएनएलचे खासगीकरण करायचे होणार हे असावे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply