Breaking News

सुधागडात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार

2 आरोपी अटकेत 2 फरारी, पाली पोलीस ठाण्यात गुन्हा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चारपैकी दोन आरोपींना पाली पोलिसांनी अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरारी आहेत. संबंधितांवर बलात्कार, पोस्को व अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी या गुन्ह्यासाठी वापरलेली कारदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

राजेश एकनाथ वाघमारे (रा. कुंभवली, ता. खालापूर) या विवाहित तरुणाने संबंधित पीडित आदिवासी मुलीसोबत ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. राजेशने संबंधित मुलीला आपले लग्न झाले असल्याचे लपवून ठेवले होते. सदर मुलीला घोडपापड येथून घेऊन जाण्यासाठी राजेश रेनॉल्ट डस्टर कार (एमएच 46, झेड 5603) मधून आला होता. त्याच्यासोबत कारचा मालक राजेश रमेश घरत (रा. नवीन पनवेल) आणि अन्य दोन साथीदारदेखील होते. त्यांनी पीडित मुलीला विचुंबे (ता. पनवेल) येथे नेले व एका रूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

शुक्रवारी (दि. 19) पीडित मुलीने रूममध्ये कोणी नसताना शेजारील महिलेचा मोबाईल घेऊन आपल्या घरी फोन केला व त्यांना नेण्यास बोलाविले. त्यानंतर शनिवारी (दि. 20) या संदर्भात पाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सदर तक्रारीनुसार या प्रकरणातील आरोपींवर भादंवि कलम 376, 363(34), बाललैंगिक अत्याचार (पोस्को) 3,4,5,6, सुधारीत अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम 3 (1) डब्ल्यू (1) (2) नुसार पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा जलद तपास करीत पाली पोलिसांनी आरोपी राजेश वाघमारे व राजेश घरत यांना अटक केली, तर दोन आरोपी फरारी आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे  करीत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply