Breaking News

लाच घेताना हवालदार जाळ्यात

पुणे ः प्रतिनिधी

मोबाइल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (47) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेळा सापळा रचून कारवाई करीत पोलिसांना पकडल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.  त्यात मंगळवारी रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात पुन्हा कारवाई झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात वानवडी पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन कारवाया केल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी काही वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबतचा जाबही विचारला होता. हवालदार करीम शेख याच्याकडे मोबाइल चोरी प्रकरणाचा तपास होता. त्याने एका 24 वर्षांच्या तरुणाकडून या प्रकरणात कारवाई करू नये म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच न दिल्यास कारवाई करण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला. तेव्हा या तरुणाकडून दोन हजार रुपये घेताना हवालदार शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, हवालदार शेख याने यापूर्वीही अशा प्रकारे कोणाकडून लाच स्वीकारली आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. सदर घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply