पोलादपूर तालुका कृषी विभागाकडून केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सध्या आर्थिक उन्नतीचे प्रयत्न विविध कृषीविकास कामांद्वारे होत असून अनेक जणांच्या तोंडाला यामुळे पाणी सुटलेले दिसून येत आहे. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यासाठी नानाविध क्लुप्त्या लढवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी थोडाफार तर काही ठिकाणी 100 टक्के भ्रष्टाचार झालेला दिसत असला तरी कार्यकर्ते जगले पाहिजेत, या उदात्त हेतूने कोणीही याविरूध्द निर्हेतूकपणे आवाज उठविताना दिसून येत नाही. परिणामी ’जो जे वांछिल तो ते लाहो’ असे मनुष्यप्राणीजातीच्या उध्दाराचे प्रयत्न प्रत्यक्षात सिमेंट बंधारे कितपत यशस्वी होण्यास उपयुक्त ठरतील, याबाबत मतभिन्नता दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून 87 गावांच्या 43 पाणलोट व्यवस्थापन कमिट्या तयार करण्यात येऊन त्यांचे सात समूह तयार करण्यात आले आहेत. या समूहांमध्ये विविध कृषीविकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 35 सिमेंट बंधार्यांचे नियोजन असताना 50 सिमेंट बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट राबविण्यात येत आहे. पार्ले, लोहारे, दिवील, तुर्भे बुद्रुक, काटेतळी या गावांत प्रत्येकी दोन, तर चरई, तुर्भे खोंडा, वझरवाडी, सवाद, हावरे, माटवण, सडवली, धारवली, बोरज, उमरठ, गोवेले, ढवळे, खोपड, कुडपण, परसुले, महाळुंगे, रानवडी, बोरावळे, फणसकोंड, भोगाव बुद्रुक, कातळी, ओंबळी या गावात प्रत्येकी एक असे सिमेंट बंधारे बांधण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवण्यात आले. यापैकी सर्वच बंधारे पूर्णत्वास जात असताना काही ठिकाणी पाणलोट व्यवस्थापन समित्यांमधील अंतर्विरोधाची परिस्थिती आणि विरोध दूर करण्यासाठी पैशांचाच बंधारा घालण्याचे प्रयत्न यामुळे ’मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी’ म्हणण्यास चांगलाच वाव आहे. मात्र, कोणीही खीर खाणारे बुडणार नसल्याने सिमेंट बंधारेच बुडण्याची शक्यता अधिक आहे.
यापैकी सर्व सिमेंट बंधारे 31 मार्चपर्यंत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याचा इशारा राजकीय पुढार्यांच्या उपस्थितीत सतत देण्यात आल्याने या कामाला उत्साहाने सुरुवात होऊन 10-15 दिवसांत बंधारे पूर्ण होण्याचा विश्वास देण्यात आला, मात्र यानंतर या कामाचा निधी प्रचंड प्रमाणात असल्याने ’थोडा माल इधर भी सरकावो,’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर कार्यकर्ता जगला पाहिजे, अशी हाकाटी विविध राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी दिल्याने कृषी विकासकामेच मृतावस्थेत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच या विविध कृषीविकास कामांसाठी ट्रॅक्टर, डम्पर आणि कामगार दुष्काळी भागातून आणण्याचे मार्गदर्शन पाणलोट व्यवस्थापन कमिट्यांना तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आल्यानंतर आयती संधी मिळाल्याची भावना तालुका कृषी कार्यालय आणि संबंधित सिमेंट बंधारे बांधणार्यांमध्ये निर्माण झाली. यातूनच सुरुवातीपासून डिझेलसाठी खर्चापोटी रक्कम जमा करण्याकडे कल वाढला. ट्रॅक्टर, डम्परचे भाडेदेखील गोळा करण्याचा सपाटा तालुका कृषी कार्यालयाकडून सुरू झाला. केंद्र सरकारचे काही तज्ज्ञदेखील अनेक सिमेंट बंधार्यांचे अप्रतिम काम झाल्याचा दाखला देत या बंधार्यांची पाहणी करून गेले. या सर्व कामांची बिले निघण्याची वेळ झाल्यानंतरही कामे अपूर्ण असताना ’दाखवा पूर्ण, घ्या समजून’ असे पुढार्यांचे फोन खणखणू लागले. बंधारे बांधण्याच्या परिसरामध्ये 200 ते 500 मीटर परिसरात पाण्याचा जरासादेखील डोह अथवा साठा नसताना बांधकामावेळी उपलब्ध पाण्यात बंधारा बांधला तरी पुढे त्यावर क्युरिंगसाठी पाणी मारायला थेंबभरदेखील पाणी उपलब्ध नसल्याने येत्या पावसाळ्यात या सिमेंट बंधार्यांपैकी अनेक बंधार्यांना जलसमाधी मिळण्याचीच शक्यता अधिक आहे.
सिमेंट बंधार्यांखेरिज चार टक्केची कामे सुरू करण्यासाठी भूमिहिन, अल्पभूधारक शेतकरी सोबत घेऊन चार कोटींचा निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली. 280 कामांपैकी 90 कामे पूर्णत्वास गेली असली तरी अन्य कामांबाबत कोणतीही माहिती लोकप्रतिनिधींनाही देण्यात आल्यानंतर या कामांमध्ये कोणाला खीर खायला घालण्यात आली याबाबत अद्यापही कोणी तोंड उघडण्यास तयार नाहीत, इतपत संबंधितांची पोटं खिरीने भरली आहेत. समतल चर आणि लूझ बोल्डर्स, जुनी बांधबंदिस्तीची दुरूस्ती आदी कामांमध्ये नारळ फोडण्याइतपतच कामे करण्यात येऊन त्यापुढील उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण करण्यात आले आहे. शेतजमिनीची मशागत करण्यासाठी रस्त्यालगतचे लाभार्थी करण्यात येऊन पुढील शेतजमिनीपर्यंत ट्रॅक्टर्स नेण्याचे टाळण्यात आले आहे. समतल चर खणण्याची संख्या प्रत्येक समूहामध्ये जी दाखविण्यात आली आहे तेवढे चर खणण्याऐवजी केवळ डोळ्यांनी खूप वाटतील आणि प्रत्यक्षात संख्या कमी भरेल अशी परिस्थिती असून यामुळे प्रत्येक चर खणण्यामागील मेहनत मजुरी हडपण्यात तालुका कृषी कार्यालयाला बेमालूमपणे यश आले आहे. तालुक्यातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कृषीविकासकामांचा निधी उपलब्ध करून देत गुडविल तयार केले असल्याने या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील पाणी खोलवर मुरलेय. त्यामुळे आता याविरूध्द आवाज उठविण्यास कोणीही धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
50 सिमेंट बंधारे ठरले कुचकामी
पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत 2.55 कोटी रुपये खर्चाच्या सुमारे 50 सिमेंट बंधार्यांचे नियोजन करून पूर्ण करण्यात आलेल्या कामाला बहुतांशी यश आल्यानंतर तालुक्यात सर्वत्र या सिमेंट बंधार्यांच्या ’ओव्हरफ्लो’ची चर्चा सुरू झाली. उन्हाळी पाणीटंचाईग्रस्त होणार्या पोलादपूर तालुक्याला या बंधार्यांतील पाण्यामुळे दिलासा मिळणार असून ज्या पाणलोट व्यवस्थापन कमिट्यांनी अंतर्गत मतभेदांमुळे सिमेंट बंधार्यांचे काम अर्धवट सोडून दिले; त्यांना ग्रामस्थांचे आगामी टंचाईकाळात बोल ऐकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली, मात्र वर्षभरातच हे सर्व सिमेंट बंधारे पाणी अडविण्यात आणि जिरविण्यात निकामी ठरून पोलादपूर तालुका पुन्हा पाणीटंचाईच्या गर्तेत लोटला गेला.
केंद्र सरकारच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सात समूहांतून 43 पाणलोट कमिट्यांमधून 81 गावांचा समावेश करण्यात आला. भूमिहिन, अल्पभूधारक, शेतमजूर यांच्यासाठी 280 कामांपैकी 90 कामे आहेत. यामध्ये समतल चर, लूझ बोल्डर आणि बंधारे यांचा समावेश करण्यात आला. 50पैकी 35 बंधार्यांमध्ये पार्ले दोन, लोहारे दोन, दिवील दोन, चरई एक, तुर्भे बुद्रुक दोन, तुर्भेखोंडा एक, वझरवाडी एक, माटवण एक, सवाद एक, हावरे एक, काटेतळी एक, सडवली एक, धारवली एक, बोरज एक, उमरठ एक, गोवेले एक, ढवळे एक, खोपड एक, कुडपण परसुले एक, म्हाळूंगे रानवडी एक, बोरावळे एक, फणसकोंड एक, भोगाव बुद्रुक एक आणि कातळी ओंबळी एक असे बंधारे बांधण्याचे निश्चित करण्यात आले. याखेरिज या कार्यक्रमांतर्गत सात समूहांतून 43 पाणलोट कमिट्यांमधून 81 गावांचा समावेश करण्यात आला व त्यांचे सात समूह तयार करण्यात आले. या समूहांमध्ये विविध कृषीविकास कामांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 35 सिमेंट बंधार्यांचे नियोजन असताना 50 सिमेंट बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट राबविण्यात आले. भूमिहिन, अल्पभूधारक, शेतमजूर यांच्यासाठी 280 कामांपैकी 90 कामे आहेत. यामध्ये ओसाड-डोंगर उतारावरच्या वरकस जमिनीवरील आडवे समतल चर, लूझ बोल्डर आणि शेतीची बांधबंदिस्ती यांचा समावेश करण्यात आला. याशिवाय चार कोटींचा निधी खर्च करण्यासाठी चार टक्केची कामे करून तालुक्यात जमिनीत पाणी जिरविण्यासाठी समतल चर आणि लूझ बोल्डर्स, जुनी बांधबंदिस्तीची दुरूस्ती आदी कामे वेळेत पूर्ण झाली. काही सिमेंट बंधार्यांचे काम उत्कृष्ट झाल्याने दिल्लीतून केंद्र सरकारच्या पाणलोट जलसंधारण समिती सदस्यांनी पाहणी करून प्रशंसा केली, तर काही गावांतील पाणलोट व्यवस्थापन कमिट्यांनी तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या विशेष प्रयत्नांना कोरडा प्रतिसाद देण्यात आला, मात्र आता या सिमेंट बंधार्यांमध्ये पाणी अडविले जाऊन ते जिरवतानाच बंधारेही ओसंडून वाहू लागल्याने गावागावांतून पाणीटंचाई दूर होणार असल्याची चर्चा सुरू झाली. ग्रामस्थांनी स्थानिक कमिट्यांनी दुर्लक्ष केले असल्यास कमिटीच्या पदाधिकार्यांवर तोंडसुख घेण्यास सुरुवातही केली. या बंधार्यांमुळे तसेच समतल चरांमुळे तालुक्यात सुमारे 30 लाख क्युबिक लिटर्स पाणी जमिनीमध्ये जिरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
-शैलेश पालकर, खबरबात