Breaking News

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘दिबां’च्या नावाचा लढा सुरूच राहणार !

पनवेलमधील बैठकीत प्रकल्पग्रस्त समितीचा राज्य सरकारला गर्भित इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त
‘दिबां’चे नाव भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत लढा कायम राहील, त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका प्रकल्पग्रस्त समितीने घेत राज्य सरकारला गर्भित इशाराही पनवेलमध्ये झालेल्या बैठकीतून दिला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी लढा कायम राहणार असून येत्या काळात सर्व आगरी संघटनांची शिखर परिषद, ‘दिबां’ची भव्य जयंती साजरी करण्याबरोबर वेळ पडल्यास पुन्हा आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण कृती समिती यांच्या विद्यमाने शहरातील आगरी समाज हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या अनुषंगाने पुढील दिशा व त्याचे नियोजन करण्यासंदर्भात तसेच स्थानिक, प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न सोडवणुकीबाबत चर्चा झाली.
लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, कार्याध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर, कॉ. भूषण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ‘दिबां’चे चिरंजीव अतुल पाटील, गुलाबराव वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, निलेश पाटील, राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
या वेळी नामकरणाबरोबरच वाढीव गावठाण घोषित करणे, अस्तित्वात असलेले गावठाण विस्तार करणे, जिल्हाधिकारी सर्वेक्षण करून सनदा अथवा प्रॉपर्टी कार्ड देणे, सिडकोतील प्रलंबित समस्या, एमआयडीसी जमिनीसंदर्भात चर्चा, औद्योगिकीकरणाकरिता संपादित जमीन, जिल्हानिहाय नोकर भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने सेवेत घ्यावे, म्हाडाच्या होऊ घातलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना घरे मिळण्यासाठी 25 टक्के आरक्षण मिळावे, खारभूमीचे प्रश्न, टोरंटो कंपनीविषयी चर्चा, रेती उत्पादकांवर झालेल्या अन्यायाविरोधात चर्चा, ओबीसी (अंदाजे 70 लाख लोकसंख्या) अंतर्गत आगरी, कराडी आरक्षणाबाबतच्या
प्रश्नांसाठी मार्गदर्शन, केंद्र सरकारने संपादित ओएनजीसी (उरण) व नेवाळी विमानतळ (कल्याण) जमिनीबाबत अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे या मागणीचा आग्रह धरण्यासाठी 13 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची, तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांची दिल्ली येथे कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांच्या भावना त्यांच्याकडे पोहचविल्या. त्या वेळी मंत्री महोदयांनी स्थानिकांच्या भावनांचा विचार करू, असे आश्वस्त केले. राज्याकडून केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा विचार होत असतो, मात्र सिडकोने अद्यापही जुना ठराव रद्द केला नाही. त्यामुळे ‘दिबां’च्या नावाचा ठराव सिडकोने करून तो राज्य सरकारकडे देऊन राज्य सरकारने ‘दिबां’च्या नावाचा ठराव केंद्र सरकारला देणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्व स्तरावर समितीद्वारे प्रयत्न केले जाणार असून ‘दिबां’चे नाव नवी मुंबई विमानतळाला लागेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे समितीने जाहीर केले.
सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचा निर्धार
लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ नामकरण कृती समिती मातृसंस्था म्हणून काम करीत आहे. त्यामुळे सर्व समितींना एकत्रित घेऊन प्रश्न मार्गी लावणार असून सर्व स्तरावर समितीच्या वतीने प्रयत्न केले जाणार आणि लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे समितीने या बैठकीत जाहीर केले.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply