Breaking News

नवी मुंबईतील ‘त्या’ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांमध्ये वाढ

आकडा 18 वर, पालकांनी घेतली धास्ती!

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही कोरोना आणि ओमायक्रॉनचे संकट आहेच. सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावलीदेखील जारी केली होती, मात्र असे असताना देखील नवी मुंबई येथून धक्कादायक माहीती पुढे आली. घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मागील 3 दिवसांत 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कतारवरून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, मात्र त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांची तब्बेत उत्तम असल्याचेदेखील सांगितले जात आहे. आज पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या 3 टीम कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत दाखल झाल्या होत्या. मात्र घाबरून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत. त्याची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहीती आहे.

शाळासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली होती, मात्र तरीही एकाच शाळेतील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

दरम्यान, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी शासनाने कोरोनासंबधी सर्व नियम काटेकोर पालन करण्याचे आवाहन करून त्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

शाळेचे होणार निर्जंतुकीकरण

घणसोलीमधील शेतकरी शिक्षण संस्था शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता इतर विद्यार्थी आणि शिक्षकांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. महानगरपालिका प्रशासनाने शाळेचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply