माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटकाळात माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रायगड यांना मदतीचा हात पुढे करण्यात आला. माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे 51 हजार रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 13) पतसंस्थेचे चेअरमन विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव, संचालक दिलीप जाधव, नरेश राजपूत, दिलीप अंबुर्ले, अरुण प्रभाळे यांनी सुपूर्द केला. या वेळी त्यांच्या समवेत व्यवस्थापक पुंडलिक गायकवाड, कर्मचारी ज्ञानेश्वर चिपळूणकर आदी उपस्थित होते. माणगाव पतसंस्थेने यापूर्वी माणगाव नगरपंचायतीला डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशिन दिली आहे. माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी संस्थेचे विशेष आभार मानून माणगावमधील इतर सामाजिक संस्था, संघटना, कंपन्या, दानशूर व्यक्तींनी या संकटसमयी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.