Breaking News

पुन्हा प्रवेश गोंधळ

वाढीव गुणांची सूज उतरली म्हणून एकीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्य मंडळाचे कौतुक केले. तर दुसरीकडे देशातील अन्य परीक्षा मंडळांमध्ये मात्र शालांतर्गत 20 गुणांच्या मूल्यमापनाची पद्धत तशीच सुरू असल्याने आता राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचे वाट्टोळे होणार अशी ओरडही होऊ लागली.

राज्य शिक्षण मंडळाच्या नुकत्याच दहावी झालेल्या बॅचचे वेगळेपण संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. नव्या अभ्यासक्रमाची नवी पुस्तके गेल्या वर्षी बरीच उशीरा उपलब्ध झाल्याने ही बॅच तशी उशीरा अभ्यासाला लागली होती. हा उशीर अद्यापही त्यांची पाठ सोडायला तयार नाही असे चित्र आहे. या बॅचचा बोर्डाच्या परीक्षेचा निकालही अपेक्षेपेक्षा दोन-चार दिवस विलंबानेच लागला आणि निकाल लागून चार दिवस झाले तरी ना अद्याप या विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका आहे, ना अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. करायला जावे एक आणि व्हावे भलतेच अशा काहिशा कचाट्यात राज्य मंडळ सापडले आहे. भाषा आणि समाजशास्त्र विषयांना तोंडी परीक्षेच्या स्वरुपात अंतर्गत मूल्यमापनातून 20 गुण दिले जात होते. हे गुण शाळा खिरापतीप्रमाणे विद्यार्थ्यांना वाटू लागल्याने गेली काही वर्षे विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्या पुढचे विक्रमी गुण मिळत होते. मंडळाने 2018-19च्या या दहावीच्या बॅचपासून अंतर्गत परीक्षा बंद केल्याने भाषा व समाजशास्त्राचे संपूर्ण 100 गुणांचे मूल्यमापन लेखी परीक्षेवर आधारित झाले. परिणामी राज्यभरात निकालाची टक्केवारी खाली घसरली तसेच अनेकांना मागील काही वर्षांच्या तुलनेत कमी गुण मिळाले. सीबीएसई बोर्डात महाराष्ट्राचा समावेश चेन्नई विभागात होतो. या विभागाचा दहावीचा निकाल यंदा 99 टक्के एवढा लागला. यात 90हून अधिक टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा राज्यात जवळपास निम्म्यावर आहे. याउलट राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या 17 लाख विद्यार्थ्यांपैकी निव्वळ 28 हजार 516 विद्याथ्यार्र्ंना 90वा त्यापेक्षा अधिक टक्के गुण मिळाले आहेत. यात मुंबई विभागातील केवळ पाच हजार 399 विद्यार्थीच आहेत. याच्या परिणामस्वरुपी उत्तम मानल्या जाणार्‍या शिक्षणसंस्थांमध्ये सीबीएसई, आयसीएसई यांच्या अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल आणि राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी प्रवेश स्पर्धेत मागे पडतील अशी भीती मोठ्या प्रमाणात व्यक्त झाली. अर्थातच इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या समकक्ष आणण्याचा दबाव राज्य मंडळावर आला आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण यंदा बंद करण्यात आल्याने लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया व्हावी. सीबीएसई व आयसीएसई विद्यार्थ्यांनाही त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावरच अकरावीत प्रवेश देण्यात यावा. त्यांचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरले जाऊ नयेत अशी सूचना राज्य मंडळाने आयोजित केलेल्या संबंधितांच्या बैठकीत पुढे आली आहे. या सूचनेवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. परंतु हे प्रकरण न्यायालयात गेल्यास सरकारची बाजू टिकणे अवघड असेल असे मत विधिज्ञ व्यक्त करीत आहेत. गुणांची सूज उतरवण्याच्या चांगल्या हेतूने राज्य मंडळाने आपल्या अखत्यारीत योग्य तो बदल केला. परंतु त्याच्या प्रवेश प्रक्रियेवरील परिणामामुळे आता प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply