ट्रेंट ब्रिज : वृत्तसंस्था
गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर सफाईदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी नॉटिंगहॅम, ट्रेंट ब्रिज येथे मैदानावर उतरणार आहे. गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी दोन हात करण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवर शिखर धवनला दुखापतीमुळे तीन आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे किवींविरुद्ध विराट कोहलीला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे, पण भारताच्या या डावपेचावर पाणी फिरण्याची लक्षणं आहेत.
इंग्लंडमधील लहरी वातावरण लक्षात घेता नॉटिंगहॅम येथे गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास भारत-न्यूझीलंड सामना होण्याची शक्यता कमीच आहे. इंग्लंडमध्ये गेले दोन दिवस पाऊस पडत आहे आणि तेथील हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस असेच वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि गुरुवारी दुपारीही हलका पाऊस पडेल. अशा परिस्थितीत तेथील कमाल तापमान 13, तर किमान तापमान 10 ते 11 डिग्री सेल्सियस असणार आहे.