Breaking News

अतिउत्साही पर्यटकांना आवरा

पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रायगड जिल्ह्यातील धबधबे व समुद्रकिनारे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येतात. पर्यटकदेखील पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होतात. कित्येकदा प्राणहानी होते. त्यामुळे सर्वांच्याच आनंदावर विरजण पडते. काही दिवसांपूर्वी कुंडलिका नदीत तीन जाणांचा बुडून मृत्यू झाला. मुरूड तालुक्यातील काशीद येथे समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. खोपोली, कर्जत येथेदेेखील बुडून अपघात घडले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात होताच जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी जाण्यास बंदी घालते. बंदी घालणे हा त्यावरील उपाय नसून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे, अतिउत्साही पर्यटकांना आवरणे, तसेच पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालणे आवश्यक आहे.

 रायगड जिल्ह्यात अनेक धबधबे आणि तलाव आहेत. महाड तालुक्यातील मांडला, केंबुर्ली, शिवथरघळ, पोलादपूर तालुक्यातील मोरझोत, रोहा तालुक्यातील सुकेळी खिंड, कर्जत तालुक्यातील आशाणी-कोशेणी, खालापूर तालुक्यातील खांडस, झेनीथ, अलिबाग तालुक्यातील सिध्देश्वर हे धबधबे प्रसिध्द आहेत. या धबधब्यांवरदेखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. समुद्रकिनारे असल्याने पावसाळ्यातही पर्यटक रायगडात येतात. वर्षा सहलीसाठी पर्यटक जिल्ह्यात येत असतात. पर्यटक पर्यटनाचा आनंद घेतात. त्यामुळे या परिसरात स्थानिकांनी छोटे व्यवसाय सुरू केले. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळत असतो, परंतु मागील काही वर्षांमध्ये धबधबे, तलाव, समुद्र, नद्या या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे अपघात या स्थळांमुळे होत नाहीत, तर पर्यटकांच्या चुकामुळे होत असतात, परंतु अपघात झाल्यानंतर जिल्हा प्रशासन तेथे जाण्यास सरसकट बंदी घालते. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो, तसेच स्थानिकांचा रोजगारदेखील बुडतो. बहुतांश अपघात हे अतिउत्साहामुळे व पर्यटकांच्या चुकांमुळे होतात. अनेकदा स्थानिकांनी सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मद्यपान करून धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात गेल्यामुळे पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. समुद्रात येणार्‍या भरती-ओहोटीची माहिती नसते. त्यामुळे अपघात होतात. त्यामुळे सरसकट बंदी न घालता अतिउत्साही पर्यटकांवर कारवाई केली पाहिजे. रायगड जिल्ह्यात कही धबधबे असे आहेत की तेथे सुरक्षित जाण्या-येण्यासाठी मार्ग नाही, परंतु हे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. तेथे जाण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. अशा ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षेच्या काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याकडे आलेल्या पर्यटकांचे स्वागतच व्हायला हवे, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. काही बेशिस्त पर्यटकांमुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्यात वाद होतात. पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत पर्यटकांची मजल गेली आहे. काही  दिवसांपूर्वीच श्रीवर्धन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पर्यटकांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. अशा बेशिस्त पर्यटकांना चाप बसवावाच लागेल. पर्यटकांनीही आपल्याला आवरले पाहिजे. आपल्यासोबत आलेल्या पर्यटकांना त्यांच्याच सहकार्‍यांनी आवरल्यास अपघात टळू शकतात. यामुळे वाद टळतील आणि सर्वांनाच पर्यटनाचा आनंद घेता येईल. पर्यटनाबरोबरच येथील खाद्यपदार्थ खाण्यासाठीही पर्यटक येतात. विशेषतः मासे खाण्यासाठी पर्यटक रायगडात येतात, मात्र हॉटेलमध्ये गेल्यावर दर ऐकूनच पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकतो. कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यातील हॉटेलमधील जेवण नक्कीच महाग आहे. पर्यटक काही तासांसाठी आले आणि गेले तर त्याचा काही उपयोग नाही. पर्यटक थांबला पाहिजे. पर्यटक थांबायला हवेत तर तशा सुविधाही हव्यात. त्या परवडणार्‍या हव्यात. हॉटेलात राहणे परवडत नसल्यामुळे बरेचसे पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी पतर जातात. हेच दिवस आहेत कमवायचे असे म्हणून वाट्टेल तसा दर लावला तर पर्यटक पुन्हा येणार नाहीत. याचा विचार हॉटेल व्यावसायिकांनी नक्कीच केला पाहिजे. अव्वाच्या सव्वा दर लावून काही लोक पर्यटकांची लूट करतात. त्यामुळे सर्वत्र रायगडची बदनामी होत आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढवायचा असेल तर पर्यटकांची होणारी लूट थांबवली पाहिजे. जिल्हा प्रशासन यात लक्ष घालत नाही, परंतु हॉटेल व्यावसायिकांंच्या संघटना आहेत. त्यांनी तरी यात लक्ष घालायला हवे. काही लोकांमुळे सबंध जिल्ह्याची बदनामी होतेय, हे कुठेतरी थांबलेच पाहिजे असे वाटते.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply