Breaking News

काँग्रेसची कानउघाडणी

राजकीय हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही घडल्या आहेत आणि घडत आहेत. मग निव्वळ झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणून हिणवणे कदापिही योग्य ठरत नाही. राजकीय हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेला समान पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे मोदींचे म्हणणे अतिशय योग्यच आहे. त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी दोषींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादनही त्यांनी केले आहे. त्यामुळे या विषयावर मोदींचे मौन का, अशी चर्चा करणार्‍यांची आता पंचाईत झाली आहे.

देशात 2014 साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून पराभूत काँग्रेस पक्षाने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. स्वत:च्या पराभवाविषयी आत्मचिंतन न करता मोदींची पार्श्वभूमी, शिक्षण, वैयक्तिक आयुष्य यावर टीकाटिप्पणी करीत गेली पाच वर्षे काँग्रेसने नकारात्मक राजकारणावरच भर दिला. या अवघ्या नकारात्मक राजकारणाचा खरपूस समाचार पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत व बुधवारी राज्यसभेत घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर ते बोलत होते. मोदींनी आपल्या भाषणांमध्ये काँग्रेसचे अक्षरश: वाभाडे काढले हे बरेच झाले. देशभरातील सुमारे 45 टक्के जनतेने भारतीय जनता पक्ष व समर्थक पक्षांच्या बाजूने स्पष्ट कौल देऊन मोदी यांच्या सरकारला पुन्हा निवडून दिले आहे. असे असताना अद्यापही ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडणार्‍या काँग्रेस पक्षाची कानउघाडणी करणे अत्यावश्यकच होते. ईव्हीएमसंबंधातील अवघ्या इतिहासाचा पाढाच मोदींनी या वेळी वाचला. आतापर्यंत देशात ईव्हीएमच्या साह्याने विधानसभेच्या 113 आणि लोकसभेच्या चार निवडणुका पार पडल्या आहेत. मग आताच ईव्हीएमच्या नावाने गळा कशासाठी? काँग्रेसनेच ही ईव्हीएम आणलेली असताना निव्वळ स्वत:च्या पराभवामुळे काँगे्रसला ती नकोशी झाली आहेत का? काँग्रेसच्या या नकारात्मक राजकारणाला जबरदस्त प्रत्युत्तर देऊन मोदीजींनी भाजपला मतदान करणार्‍या जनतेच्या मनातली भावनाच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 25 जून रोजी आणीबाणीच्या 44व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मोदीजींनी एक प्रकारे काँग्रेसची संसदेत उत्तरपूजाच केली असे म्हणावे लागेल. काँग्रेस हरली म्हणजे देश हरला असे म्हणणार्‍यांना मोदींनी आपल्या सडेतोड भाषणाने अगदी निरुत्तर करून टाकले. लोकशाहीचा गळा घोटणारे नेमके कोण आहेत याचा विसर आपण जनतेला पडू देणार नाही असेही बजावायला मोदी विसरले नाहीत. झारखंडमध्ये जमावाच्या मारहाणीत एका मुस्लिम तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे मोदींनी नमूद केले, परंतु त्या एका घटनेवरून संपूर्ण झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणणार्‍यांनाही त्यांनी जाब विचारलाच. गेल्या दोन दिवसांत आणखीही काही ठिकाणी मॉब लिंचिंगच्या म्हणजेच जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांचा राजकारणासाठी वापर केला जाता कामा नये, असेही मोदींनी खडसावले आहे. राजकीय हिंसाचाराच्या या घटना कुठेही खपवून घेतल्या जाता कामा नयेत. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे त्यांचा निषेधच केला पाहिजे हे मोदींचे म्हणणे कुठल्याही सुजाण नागरिकाला पटेल असेच आहे. राजकीय पंडित आणि सर्व राजकीय पक्षांचे धुरीण याचा गांभीर्याने विचार करून त्या दिशेने पावले उचलतील अशी अपेक्षा करूया.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply