Breaking News

नवी मुंबई महापालिकेने बनवले स्वॅब सॅम्पलसाठी विशेष केबिन

नवी मुंबई : बातमीदार

कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरणारा असल्याने दैनंदिन जीवनात नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अथवा कोरोना संबंधित लक्षणे आढळणार्‍या व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेताना अधिक दक्षता घेण्याची गरज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ कोरियाच्या धर्तीवर तीन बाय तीन फूट आकाराच्या केबिनच्या स्वरुपात कोविड-19 स्वॅब सॅम्पल कलेक्शन सेंटर तयार केले आहे. याव्दारे एकप्रकारे स्वॅब सॅम्पल घेणार्‍या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 चे सुरक्षा कवच लाभलेले आहे. वाशी येथील डेडिकेटेड कोविड-19 रुग्णालय याठिकाणी दोन तसेच ऐरोली व नेरूळ सार्वजनिक रुग्णालय आणि बेलापूर येथील माता बाल रुग्णालय याठिकाणी एक अशी एकूण पाच कोविड-19 स्वॅब सँपल कलेक्शन सेंटर तयार करण्यात आली असून त्याद्वारे सुरक्षितरित्या स्वॅब कलेक्शन करण्यात येत आहे. ही स्वॅब कलेक्शन सेंटर म्हणजे तीन बाय तीन फूट आकाराची केबीन असून त्याला पुढील बाजुने समोरील माणूस दिसू शकेल अशाप्रकारे काचेचे आवरण लावण्यात आलेले आहे. या काचेला दोन हॅण्डग्लोव्हज जोडण्यात आले असून स्वॅब कलेक्शन करणारी व्यक्ती या केबिनमध्ये जाऊन केबिन बाहेरील व्यक्तीचे हॅण्डग्लोव्हजद्वारे सुरक्षितरित्या स्वॅब सॅम्पल घेऊ शकते. यामुळे या दोघांचा परस्पर संपर्क टाळला जाऊन संभाव्य संसर्ग टाळला जातो. या काचेच्या केबिनमुळे सॅम्पल घेणार्‍या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना एक प्रकारचे सुरक्षा कवच लाभलेले असून त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर झाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply