Breaking News

आजी-माजी कर्णधारांनी सावरले; भारताच्या 268 धावा

मँचेस्टर ः वृत्तसंस्था

भारत आणि विंडीज यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर गुरुवारी (दि. 27) झाला. या सामन्यात 50 षटकांच्या अखेरीस 7 बाद 268 धावा करीत भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 269 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अत्यंत सावध सुरुवात केली, पण रोहितने फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच केमार रोचने त्याचा अडसर दूर केला. भारताचा रोहित शर्मा एक चौकार आणि एक षटकार खेचून 18 धावांवर माघारी परतला. रोहित स्वस्तात बाद झाल्यावर कोहलीच्या साथीने सलामीवीर राहुलने सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि 11 व्या षटकात भारताचे अर्धशतक साकारले. सलामीवीर राहुलचे अर्धशतक मात्र दोन धावांनी हुकले. त्याने सहा चौकार लगावत 68 चेंडूत 48 धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डरने त्याला त्रिफळाचीत केले.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला विजय शंकर 14 धावांवर बाद झाला. यात त्याने तीन चौकार खेचले होते, पण केमार रोचने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले.

दरम्यान कर्णधार कोहलीने 56 चेंडूंत दमदार अर्धशतक ठोकले. विराटचे कोहलीने अर्धशतक केल्यानंतर लगेचच केदार जाधव माघारी परतला. 10 चेंडूंत त्याने केवळ 7 धावा केल्या. या खेळीत त्याने 1 चौकार लगावला. विजय शंकरप्रमाणेच केदारदेखील केमार रोचच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकडे झेल देत बाद झाला. धोनी आणि विराट यांच्यात भागीदारी होत असताना कर्णधार कोहली तंबूत परतला. धोनीच्या संथ खेळीमुळे विराट कोहलीला फटकेबाजी करणे क्रमप्राप्त ठरले. तशातच तो फटका खेळून बाद झाला. त्याने 8 चौकार खेचत 82 चेंडूंत 72 धावा केल्या. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. पाच सामन्यांत चार विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. वेस्ट इंडिजला सहा सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला असून, चार पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात कार्लोस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला अनपेक्षित असा विजय मिळवून देण्याकडे कूच केली होती, मात्र षटकारांची आतषबाजी करणार्‍या ब्रेथवेटची शतकी झुंज अखेर पाच धावांनी व्यर्थ ठरली होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply