Breaking News

तलाठी भरती परीक्षा उद्यापासून

अलिबाग : महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मंगळवारी (दि. 2) परीक्षांना सुरुवात होत आहे. 2 ते 26 जुलै या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही माहिती हवी असल्यास अथवा तक्रार असल्यास त्यासाठी टोल फ्री क्रमांक व ई-मेल सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधांचा उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. महसूल विभागाच्या अखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महाआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 2.30 ते 4.30 अशा दोन बॅचेसमध्ये तलाठी (गट-क) संवर्गासाठी भरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

माणगावात सोमवारी वृक्षारोपण

माणगाव : दि. 1 ते 7 जुलैदरम्यान राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या या उपक्रमानुसार माणगाव महसूल विभागास देण्यात आलेल्या सूचनेनुसार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन सोमवारी (दि. 1) सकाळी 9 वा. मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसील कार्यालय माणगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे यांनी केले आहे.

तडीपारीच्या आदेशाचा भंग

नागोठणे, पेण : एप्रिल महिन्यात तडीपारीचा आदेश होऊनही शिहू ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळटेप येथील आरोपी संजय भोईर हा आदेशाचा अवमान करून सतत आपल्याच गावी राहत आहे. या विषयाचा गांभीर्यपणे विचार करून भोईर याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिहू ग्रामपंचायत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष वसंत मोकल यांनी पेण उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली असून त्याची प्रत विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कोकण विभाग आयुक्त आणि रोहे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे देण्यात आली आहे. पेण पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिहू ग्रामपंचायत सदस्य संजय भोईर यांच्याविरुद्ध पेण उपविभागीय अधिकार्‍यांनी 11 एप्रिलला तडीपारीचा आदेश जारी केला होता, पण ते गावातच राहत असल्याचे अनेकांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply