Breaking News

वळवण आणि शिरोंडा धरणाचे पाणी कर्जतच्या मदतीला

कर्जत : बातमीदार

पावसाळा वगळता कोरडी असलेली उल्हास नदी काही दिवसांपासून खंडाळा घाटातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वाहू लागली होती. त्या बातमीचा माग घेतला असता उल्हास नदीचा उगम ज्या लोणावळ्याच्या पायथ्याशी होतो, त्या ठिकाणी टाटाच्या दोन धरणांचा आऊटलेट असून त्यातून ते पाणी सोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्यानेदेखील त्याची पाहणी केली असून खासदार श्रीरंग बारणे यांनी ते पाणी वर्षातील बाराही महिने सोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थानिक करू लागले आहेत.

उल्हास नदी पावसाळा वगळता कोरडी असल्याने कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागात पाणीटंचाईला त्या भागातील जनतेला सामोरे जावे लागते, मात्र जून महिन्यात उल्हास नदी कोरडी असताना अचानक नदीच्या कोरड्या पात्रात पाणी दिसू लागले. त्यात नदीमध्ये असलेले सिमेंट बंधारे काठोकाठ भरू लागल्याने काहीतरी चमत्कार झाला असल्याच्या खबरा सर्वत्र पोहचल्या.त्याबाबत उल्हास नदीची जबाबदारी असलेल्या कर्जत येथील पाटबंधारे विभागाला विचारण्यात आले असता त्यांनीदेखील आम्हाला काही माहिती नसल्याचे उत्तर दिले होते, मात्र कोरड्या पडणार्‍या भागात सिमेंट बंधारे बांधणारे माजी सरपंच संतोष भोईर यांनी लोणावळा येथे जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भरत काटले हेदेखील लोणावळा भागात पोहचले होते.

त्यावेळी लोणावळा येथे असलेल्या वळवण आणि शिरोंडा या दोन धरणांतून पाणी घाटाच्या खाली लोणावळा येथे सोडले गेल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही धरणांचे आऊटलेट हे लोणावळा घाटाच्या खाली असलेल्या कर्जतकडे आहेत. पावसाळ्यात त्या आऊटलेटमधून त्या दोन्ही धरणांतील अतिरिक्त पाणी सोडले जात असते, मात्र उन्हाळ्यात असे कधीही झाले नसल्याने कर्जत तालुक्यातील कोंडीवडे, बीड, खांडपे, शिरसे या ग्रामपंचायतींमधील लोक अचानक नदी वाहू लागल्याने हैराण झाले होते. त्यात कुठेही पाऊस पडत नसल्याने नदी वाहू लागल्याने स्थानिक आनंदात  होते. याबाबत माजी सरपंच आणि लोणावळा येथे जाऊन पाहणी करणारे माजी सरपंच संतोष भोईर यांनी आमच्या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाटबंधारे खात्याने त्या दोन्ही धरणांतून थोडे थोडे पाणी खाली कर्जतला सोडावे, अशी मागणी करणारे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे एप्रिल 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दौर्‍यात आले असता खासदार बारणे यांना बीड गावातील ग्रामस्थांनी लोणावळा भागात असलेल्या धरणातील पाणी बारमाही सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता ते पाणी कायमस्वरूपी सोडले जावे यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply