Breaking News

मेन लाईन आणि हार्बर लाईन जोडण्याकडे दुर्लक्ष

पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे 1996 मध्ये सुरू झाली. पनवेल शहराचा विकास होत असताना रेल्वेमुळे झपाट्याने आजुबाजूच्या परिसराचे नागरीकरण होत आहे. आज या स्थानकातून वर्षभरात जवळपास 50 कोटी प्रवासी प्रवास करीत असल्याने लवकरच या स्थानकाचा समावेश ‘अ 1’ श्रेणीत होणार आहे. पनवेल स्टेशनमध्ये प्रवाशांना पुरेशा मूलभूत सुविधांपासून तर वंचित ठेवण्यात आले आहेच पण भविष्यात उपयोगी पडणार्‍या मेनलाईन आणि हार्बर लाईन ट्रॅक जोडण्याकडे ही दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पनवेल रेल्वे स्टेशनला हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरुन लोकल वाहतूक सुरू असते. दिव्याहून  येणार्‍या लाईनवरुन मेल, एक्सप्रेस आणि मालगाडीची वाहतूक सुरू असते. मध्य रेल्वेच्या या स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4 वरुन रोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, ठाणे आणि अंधेरी अशा 333 लोकलच्या  फेर्‍या होतात. याशिवाय फलाट क्रमांक 5 ते 7 वरुन मेल व एक्सप्रेसच्या नियमित 57 आणि 3 हॉलिडे एक्सप्रेस गाड्या जातात. या मार्गाना जोडल्यास भविष्यात कोणतीही अडचण आल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. पण एक किलोमीटर लुपच्या या कामाकडे  रेल्वेने दुर्लक्ष केले आहे. ते काम पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ ही वाचू शकतो.

पनवेलच्या पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेल बाजूला मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढली आहे. या बाजूला येताना फलाट पाचवरील जिन्याने वर जावे लागते. फलाट पाचवर असलेला जिना अत्यंत अरुंद आहे. सकाळी, संध्याकाळी आणि  मेल गाडी आल्यावर लोकलच्या प्रवाशांची वरती जाण्यासाठी होणारी गर्दी ही अपघातला निमंत्रण देणारी आहे. येथे क्रमांक 1 ते 4 फलाटावर लोकल गाड्या तर क्रमांक 5 ते 7 वर मेल आणि एक्स्प्रेस गाड्या येत असतात. पनवेल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास हा नवीन पनवेल बाजूला झाला आहे. या बाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वसाहती व इंजिनियरिंग व इतर महाविद्यालये असल्याने प्रवाशांची विद्यार्थ्यांची जा-ये असते. याबाजूला जाण्यासाठी 6 फूट रुंदीचा पूल आहे. लोकल थांबल्यावर अनेकजण या पुलावर जाण्यासाठी फलाटावरून  धावत जात असतात. याचवेळी फलाट क्रमांक 6 किंवा 7वर लांब पल्ल्याची गाडी आल्यास प्रवाशांची कोंडी होते. त्याचा फायदा पाकीटमार घेतात.

या बाबत तक्रार केल्यावर फलाट क्रमांक 2 समोरील पुलाचा वापर करावा, असे रेल्वे अधिकारी सांगतात. पण घाईच्यावेळी उलट्या बाजूने जाण्यास प्रवाशांची तयारी नसते. या ठिकाणी रुग्ण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची मागणी करून ही ती बसवली जात नाही.  त्यामुळे अपंग किंवा रुग्णांना जिना चढून जाता येत नसल्यास  उचलून नेण्यासाठी असलेल्या एका खुर्चीसाठी कमीत कमी  80 ते 200  रुपये द्यावे लागतात. त्यामूळे मुंबईतून 20 रुपयात आलेल्या माणसाला स्थानकातून बाहेर पाडण्यासाठी 200 रुपये खर्च करावे लागतात. ते परवडणारे नसल्याने घरातील माणसांनाच त्यांना उचलून न्यावे लागते. व्हीलचेअर आहेत पण त्या कोठे मिळतील, याची माहिती देणारा फलक कोठेही लावलेला नाही.

पनवेलला रेल्वेचे जंक्शन होणार म्हणून काम सुरू आहे. येथे 12 फलाट होणार आहेत. दोन्ही बाजूला गाड्या पार्कींगची सोय, तिकीट घर, प्रतिक्षालय यासाठी नवीन इमारती बांधण्यात येत असताना पनवेलला नवीन बांधकाम सुरू असल्याचे सांगत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी काही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनवर सरकता जिना बसविण्यासाठी प्रवाशी संघाने आणि अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या मागणीचा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर फलाट क्रमांक 6 आणि 7वर जाण्यासाठी सरकता जिना बसविण्याचे काम पूर्ण होऊन तो सुरू झाला पण अनेकवेळा तो बंद असतो. तो सुरू करण्यासाठी माणसे ठेवली आहेत ती जिन्याच्या खाली बसून मजा बघत असतात. त्याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

पनवेल स्टेशनवर नवीन पनवेल बाजूला दवाखाना बांधून वर्ष होत आले तरी त्याठिकाणी डॉक्टरची नेमणूक करण्यात आलेली नसल्याने त्याचा काहीच उपयोग नाही. मार्च किवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मेडिकल ऑफिसरच्या नेमणुकीची निविदा निघणार आहे, असे सांगण्यात आले होते. उपनगरीय फलाटाच्या बाजूला कॅफेटेरियाची गरज असल्याची प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी आहे. नवीन स्टेशन प्लॅनप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 अणि 4 मालगाडीसाठी जाणार असल्याने त्याची जागा निश्चित करण्यास वेळ लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. पनवेल स्टेशनवर प्रवाशांना रिक्षावाल्यांचा मोठा त्रास होतो. अनेक रिक्षावाले फलाटापर्यंत येऊन प्रवाशाला आपल्या रिक्षात घेऊन जातात अशा रिक्षावाल्यांकडून लुटण्याचे अनेक प्रकार घडले असून ही त्यांच्यावर कोणी कारवाई करायची या वादात रेल्वे पोलीस, शहर पोलीस आणि आरटीओ अधिकारी असल्याने लुटमारीचा धंदा जोरात सुरू आहे.

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply