Saturday , March 25 2023
Breaking News

यंत्रणेत सुधाराची गरज

एकीकडे रेल्वे, बस आदी सार्वजनिक सेवा कोलमडलेल्या असतानाच रिक्षा, टॅक्सीवाले ग्राहकांना नाडतात. कुठे जायचे, कुठे जायचे नाही, यावरून प्रवाशांशी अरेरावीची भाषा करतात. रेल्वे, रस्त्यांची अवस्था यात गेल्या अनेक वर्षांत फारशी सुधारणा नाही. अर्थात हळूहळू परिस्थिती पालटते आहे. येत्या काही वर्षांत मेट्रोचे जाळे शहरभरात पसरेल. उपनगरे व आसपासचा परिसरही अधिक चांगल्या तर्‍हेने महानगराशी जोडला जाईल. या मूलभूत सेवेच्या उभारणीमुळे आज जागोजागी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आलेले आहे. अरुंद रस्त्यांवर त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी होते आहे. लोक सोशिकपणे या गैरसोयींशी जुळवून घेत आहेत.

मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहणे यंदा मुंबई व आसपासच्या प्रदेशातील लोकांना भाग पडले होते. परंतु आगमनानंतर आठवडाभरातच पावसामुळे मुुंबईची तुंबई झाल्याने मुंबईकर व आसपासच्या परिसरातील नागरिकांवर हबकून घरी बसण्याची पाळी ओढवली. दोन-चार जोरदार सरी कोसळल्या तरी जिथे पाणी साचून राहते, तिथे तर सोमवारी पाणी साठून रहदारीची कोंडी झालीच. पण एकंदरच मुंबई व आसपासच्या परिसरात सोमवारी आणि मंगळवारी सकाळी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाल्याचे दिसून आले. मध्य रेल्वेची सेवा मंगळवारी सकाळी पूर्णत: कोलमडल्याचे दिसून आले. अर्थातच, उपनगरे व पलीकडील पनवेल, उरण, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून महानगरीत कामाधंद्यासाठी येणार्‍यांना रेल्वेस्थानकांतून घरी परतावे लागले. मध्य आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड असेल वा वांद्रे कुर्ला संकुलाचा परिसर दोन्हीकडील बराचसा भाग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्याचे आवाहन सरकारी पातळीवरून वेळीच करण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अशी सूचना वेळेत न आल्यास द्विधा मन:स्थितीत विद्यार्थी घराबाहेर पडतात आणि बाहेर वाहतुकीची कोंडी झालेली असल्यास अकारण त्यात अडकून पडतात. नोकरदारांचीही अवस्था तशीच काहिशी असते. जोरदार पावसामुळे उपनगरी रेल्वे व रस्त्यांवरील वाहतूकही लगेचच कोलमडते. परंतु रेल्वे व रस्ते वाहतुकीच्या कोंडीबद्दल किमान वेळीच सर्व सूचना मिळाल्यास अनेकांचा मनस्ताप बर्‍याच अंशी टळू शकेल किंवा कमी होऊ शकेल. पण वर्षानुवर्षे परिस्थितीत किमान या मूलभूत सेवेबद्दलही सकारात्मक बदल होताना दिसत नाही. संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती शक्य तितक्या तातडीने मिळण्याची व्यवस्थाही अद्यापही तितकीशी मार्गी लागलेली दिसत नाही. भविष्यातील सकारात्मक बदलांसाठी ही गैरसोय अपरिहार्य आहे, हे नागरिकांना समजते. वाहतूक व्यवस्था कोलमडलेल्या असताना साठलेल्या पाण्यातून वाट काढत लोकांना जावे लागते. हे सारे अधिक मोठ्या संकटांना आमंत्रण देणारे असते. त्यामुळेच परिस्थितीबद्दल किमान वेळेत सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्याची दक्षता यंत्रणांनी घेतल्यास लोकांना मोठा दिलासा मिळू शकेल. महानगर मुंबईच्या जवळ असलेल्या पनवेल, उरण शहरांचीही व्याप्ती वाढते आहे. त्यामुळे या शहरांना आणि आसपासच्या गावांना पावसाचा आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या पाणी समस्येचा भविष्यात कठोरपणे सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलून भविष्यातील तजवीज करणे आवश्यक आहे.

Check Also

फिरूनि नवी जन्मेन मी…

सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे …

Leave a Reply