Breaking News

मनपात स्वतंत्र प्रभाग कार्यालये

सिडकोकडून चार ठिकाणी भूखंडांची खरेदी

पनवेल ः बातमीदार  – प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यासाठी पनवेल महापालिकेने तयारी सुरू केली असून, स्वतंत्र प्रभाग कार्यालये उभारण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांची भूखंड खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली कार्यालये स्वतंत्र ठिकाणी असणार आहेत.

110 चौरस किलोमीटरच्या पनवेल महापालिका क्षेत्रात विसर्जित झालेल्या पनवेल नगरपालिकेचे क्षेत्र, सिडकोच्या खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल विकसित वसाहतींचा समावेश आहे. याशिवाय पनवेल तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींमधील 29 गावेदेखील आहेत. महापालिकेच्या स्थापनेनंतर या सर्व भागांना सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेकडे स्वतःची सक्षम यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. 20 प्रभागांतून निवडून आलेल्या 78 नगरसेवकांना, नागरिकांना प्रश्न सोडविण्यासाठी घराजवळ जागा उपलब्ध करण्याची तयारी पनवेल महापालिकेने सुरू केली आहे. चार प्रभागांत विभागण्यात आलेल्या पनवेल महापालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल शहर असे विभाग करण्यात आले आहेत. या विभागाप्रमाणे प्रभाग कार्यालये, प्रभाग समिती सभापती आणि प्रभाग अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या प्रभाग कार्यालये पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयात थाटण्यात आली आहेत. एका प्रभागात एक शहर आणि आजूबाजूच्या गावांच्या परिसराचे काम चालणार असल्यामुळे प्रशस्त प्रभाग कार्यालयांची आवश्यकता असणार आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी भविष्यातील गरज ओळखून सिडकोकडून विभागनिहाय भूखंडांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रभाग कार्यालयांचे भूखंड निश्चित झाले असून भविष्यात याच ठिकाणी महापालिकेची चार प्रभाग कार्यालये आहेत. यामध्ये खारघरचे प्रभाग कार्यालय सेक्टर 19मधील भूखंड क्रमांक 14 येथे, कामोठे येथील प्रभाग कार्यालय सेक्टर 11 येथील भूखंड क्रमांक 13, पनवेलचे प्रभाग कार्यालय नवीन पनवेल पश्चिमेला सेक्टर 16 ए येथील भूखंड क्रमांक 7 आणि कळंबोलीचे प्रभाग कार्यालयासाठी सेक्टर 8ई येथील भूखंड क्रमांक 6, 7 आणि 8 आदी भूखंड खरेदी करण्यात येणार आहेत. चारही भूखंडांची खरेदी करण्यासाठी महापालिका सुमारे 8 कोटी रुपये खर्च करणार आहे. संबंधित भूखंड प्रभाग कार्यालयांसाठी खरेदी करण्याचे निश्चित झाले आहे. भविष्यात या ठिकाणी प्रशस्त कार्यालये उभी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. ही प्रभाग कार्यालये कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना प्रत्येक कामासाठी पनवेल शहरात येण्याची गरज भासणार नाही. नागरिकांचा वेळ आणि शारीरिक त्रास वाचणार आहे.

गर्दी कमी होणार

पनवेल महापालिकेचे मुख्यालयदेखील पनवेल शहराबाहेर सिडकोच्या हद्दीत बांधण्यात येणार आहे. पनवेल भागाचे प्रभाग कार्यालयदेखील याच परिसरात सेक्टर 16 ए मध्ये असणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या म्हणजेच सध्याच्या मुख्यालयात असलेली गर्दी पुढील काही वर्षांत कमी होणार आहे. पूर्वीच्या नगरपालिका क्षेत्रात मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयदेखील नसल्यामुळे पनवेल शहरात येणारे कर्मचारी आणि नागरिकांची वर्दळ भविष्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply