डागडुजीअभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; पालकवर्ग चिंतेत
महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. तालुक्यातील जवळपास 45 प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांच्या दुरुस्तीबाबत महाड पंचायत समितीने रायगड जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दोनच दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील शेलटोली गावातील प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. कोळोसे, कोंझर, शिरवली या शाळांच्या इमारती तर अत्यंत धोकादायक झाल्या आहेत. रेवतळे प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छप्पर मोडले आहे. तर शिरवली येथील शाळेची भिंत कोसळून दोन वर्ष झाली तरी दुरुस्ती झालेली नाही. आंबे शिवथर येथील शाळेला गळती लागली आहे. या शिवाय तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळा मोडकळीस आल्या आहेत. महाडमधील अनेक शाळांच्या इमारती 50 वर्षाहून अधिक जुन्या आहेत. यामुळे दर वर्षी दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थ मागणी करतात. सर्व शिक्षा अभियानमधून केल्या गेलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतीदेखील कुचकामी ठरल्या. नव्याने बांधण्यात येणार्या कॉन्क्रीटच्या शाळादेखील गळू लागल्या आहेत. सर्व शिक्षा अभियान आता बंद झाल्याने याठिकाणी इमारतीची दुरुस्ती कशी करायची असा प्रश्न पंचायत समितीसमोर आहे. महाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील 45 शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवून दिला आहे. मात्र येथून अद्याप कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना गळक्या छपराखाली बसावे लागत आहे. जुन्या शाळांच्या भिंती कमकुवत झाल्याने त्या कधीही पडून दुर्घटना घडू शकते. प्रशासकीय दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्हा नियोजनमधून तरी या शाळा दुरुस्त करून घ्याव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोंझर शाळेची इमारत धोकादायक स्थितीत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात अनेक शाळांच्या इमारती अशाच पद्धतीने आहेत. जिल्हा नियोजनमधून या शाळांची दुरुस्ती केली जावी.
-राजू रेवणे, ग्रामस्थ, कोंझर, ता. महाड
तालुक्यातील नादुरुस्त प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव महाड पंचायत समितीने वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. शिवाय जिल्हा नियोजनच्या बैठकीत देखील शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला जाईल.
-सचिन पवार, कनिष्ठ अभियंता, सर्वशिक्षा अभियान, महाड