Breaking News

खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी

प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून पाहणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

दोन तीन दिवसातील मुसळधार पावसाचा फायदा घेत खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आता मात्र या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहेत. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही महिन्यांपुर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने इंडिया स्टील कंपनीचे उत्पादन बंद करण्याची कारवाई केली होती. तसेच वारंवार होणारे अपघात, अनियंत्रित ध्वनी प्रदूषण व या कंपनी आवारात मोठ्या प्रमाणात रासायनिक कचरा जमा करून ठेवला असल्याने स्थानिक रहिवासी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात सतत संघर्ष सुरू आहे. पाऊस पडत असल्याचा फायदा घेत या कंपनी व्यवस्थापनाने सोमवार व मंगळवारी बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडले. हा प्रकार स्थानिक रहिवाशांनी उघडकीस आणला आहे. त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड विभागाकडे तक्रारी केल्या. त्यानुसार मंगळवारी (दि. 2) मंडळाच्या अधिकार्‍यांनी कंपनीत येऊन या प्रकारची चौकशी केली व विविध नमुनेही तपासणीसाठी घेतले. या बाबत कंपनी व्यवस्थापन अधिकारी एस. व्ही. पानमन यांना विचारले असता त्यांनी मात्र असा कोणताही प्रकार झाला नसून, कंपनीत तुंबलेले पावसाचे पाणी आम्ही बाहेर सोडले असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्यातील रासायनिक सांडपाणी सोडून इंडिया स्टील कंपनीने सिद्धार्थनगर जवळून वाहणारा नाला प्रदूषित केला आहे. हा नाला पातळगंगा नदीला मिळत असल्याने नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिक उग्र वासाने हैराण झाले होते. याबाबत प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली असून, त्यांनी कंपनी व घटनास्थळाची पाहणी केली आहे. आता काय कारवाई होते, याची वाट पाहत आहोत.

-किशोर साळुंखे, स्थानिक नागरिक, विहारी सिद्धार्थनगर

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply