Breaking News

‘माथेरानचा शारलोट तलाव गाळमुक्त करा’

कर्जत ः बातमीदार  – माथेरानकरांची व येथे आलेल्या पर्यटकांची तहान भागवणारा महत्त्वपूर्ण ब्रिटिशकालीन तलाव गेली पाच वर्षे साफ करून गाळमुक्त केला नसल्याने मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो गाळ काढून हा तलाव गाळमुक्त करून नागरिकांना व पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्या, अशी मागणी येथील स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे केली आहे.

माथेरान या पर्यटनस्थळांची लोकसंख्या जरी कमी असली, तरी येथे वर्षाकाठी लाखो पर्यटक येतात. त्यांना पिण्यासाठी या ब्रिटिशकालीन एकमेव असलेल्या तलावाचा उपयोग होतो. या तलावात 15 लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा साचतो. त्यामुळे पर्यटक व स्थानिक यांची संख्या पाहता हा तलाव फक्त पाच महिने तहान भागवतो. या तलावाची संपूर्ण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे प्राधिकरण या तलावातून एप्रिल व मे महिन्याच्या पर्यटन हंगामात पाणीटंचाई भासू नये, म्हणून जानेवारीनंतर पाणी उपसा करते, पण या वर्षी पाण्याचे नियोजन करूनसुद्धा लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मे महिन्याच्या 15 तारखेलाच या तलावाने तळ गाठला होता, यामध्ये आठ फूट गाळ साचला होता. हा गाळ साचण्याचे मुख्य कारण म्हणजे हा तलाव पाच वर्षे गाळमुक्त केलाच नव्हता.

पाणी संपल्यामुळे फक्त गाळ या तलावात दिसत असून या मातीयुक्त गाळामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले व गाळाचे प्रमाण वाढले. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मे महिन्याच्या शेवटी येथील लोकांना या लाल मातीयुक्त पाणी दिले गेले, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तलावाच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाही, असा गंभीर आरोप येथील स्थानिक करीत आहेत. मागील पाच वर्षांत म्हणजे 2014 साली प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने श्रमदान करून या तलावाची उंची वाढवली होती, तर 2015मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी श्रमदान करून हा संपूर्ण तलाव गाळमुक्त केला होता, त्यामुळे माथेरानकरांना पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाली होती. या श्रमदानामुळे जीवन प्राधिकरणाचे पैसे मोठ्या प्रमाणात वाचले होते, मग या कामाकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे.

शारलोट तलाव नगरपालिकेकडे हस्तांतरित करावा, असे पत्र आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहे, पण प्राधिकरण द्यायला तयार नाही. या तलावाची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. हा तलाव गेली पाच वर्षे स्वच्छ न केल्यामुळे गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. याबाबत पुन्हा श्रीसदस्यांनी स्वच्छता करण्याविषयी पालिकेला पत्र दिले आहे व त्याबाबत आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कळविलेसुद्धा आहे.

-प्रसाद सावंत, बांधकाम सभापती

माथेरान शारलोट तलावाची स्वच्छता ही गेली पाच वर्षे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली नाही हा त्यांचा हलगर्जीपणा आहे. या पाण्याचे भरमसाठ दर वाढवूनसुद्धा आम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. हा प्राधिकरणाचा निष्क्रियपणा आहे. या वर्षी तरी प्राधिकरणाने हा तलाव स्वच्छ करून पाणी वाढवून साठविण्याचे नियोजन करावे.

-केतन रामाणे, उपाध्यक्ष कोकणवासी समाज

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply