Tuesday , March 28 2023
Breaking News

तक्रार

पनवेल एसटी स्टँड. सकाळची वेळ. दुसर्‍या दिवशी एकादशी असल्याने पंढरपूरला जाणार्‍यांची मोठी गर्दी होती. मुंबई, ठाणे, बोरिवली आणि पालघरकडून पंढरपूरला जाणार्‍या गाड्या येत होत्या, पण त्यात बसायला जागा नसल्याने कोणी गाडीत चढत नव्हते. एक पाच-सहा मध्यमवयीन व्यक्तींचा ग्रुप आला. त्यांनाही पंढरपूरला जायचे होते. पनवेलहून सुटणारी गाडी आता नसल्याचे समजल्याने त्यांनी महामंडळाचा उध्दार करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने आपण डेपोत जाऊन गाडी सोडायची मागणी करू, या अशी चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण दुसर्‍याने जावे असे सुचवू लागला. कोणीच स्वतः जायला तयार नव्हते. फक्त एसटीचा कारभार कसा आहे या बद्दल जोर जोरात बोलत होते. आज समाजात असेच अनेक जण पाहायला मिळतात जे व्यवस्थेबद्दल खूप बोलत असतात, पण त्याबद्दल तक्रार करायची वेळ आली की पळ काढतात. आपल्याला हवी असलेली सुविधा मागण्यासाठीही यांना भीती वाटते. यापेक्षा दुर्दैव ते काय?

यावरून एक गोष्ट आठवली इंद्रदेवाच्या दरबारात एकदा काही मच्छर वार्‍याबद्दल तक्रार करायला जातात. इंद्रदेव त्यांची तक्रार ऐकून घेतात आणि वार्‍याला दरबारात हजर व्हायला सांगतात. वारा दरबारात येताच मच्छर तेथून घाबरून निघून जातात. आता मच्छरच त्यांची बाजू मांडायला नसल्याने तक्रारीचा निकाला देण्याचा प्रश्नच आला नाही. तसेच काहीसे आपले होत असते. आज समाजात प्रत्येक जण कोणतीही समस्या असो. त्यावर जोरजोरात बोलत असतो. सुविधा पुरवणारी यंत्रणा कशा चुका करते. त्यात काय सुधारणा करायला हवी याबद्दल चौकात, पानटपरीवर जोर-जोरात बोलणार्‍यांना समोर पत्रकार दिसल्यावर तर नेहमीच चेव चढतो. तुम्ही पत्रकार याच्यावर लिहीत नाहीत, असे करीत नाहीत, तसे करीत नाहीत, असे ऐकवले जाते. त्यांना सांगितले की तुम्ही तक्रार करा मग आपण ती बातमी छापू की यांची बोबडी वळते. बातमी आली पाहिजे पण माझे नाव नको, असे सांगून पळ काढतात.

याउलट काही व्यक्ती असतात त्यांना सतत तक्रार करायची सवय असते. काही झाले की लगेच वरिष्ठांकडे तक्रार करतात. बारीकसारिक कारणावरूनही एक फूलस्केप भरून घडलेल्या आणि न घडलेल्या प्रकाराचे रसभरीत वर्णन करून तक्रार केली जाते. अशा तक्रारी वाचण्यातच जास्त वेळ जातो आणि वाचणार्‍याची करमणूकही होत असते. जनाब अंतुले मुख्यमंत्री असताना श्रीवर्धन मतदारसंघातले भाईजान एसटीत वाहकाजवळ वाद झाला की, तू मला वळखत नाहीस मी साहेबांकडे (मुख्यमंत्री) तुझी तक्रार करीन, अशी धमकी देताना अनेक वेळा पाहिले होते. तो बिचारा वाहक गडबडून जात असे. आजही अनेक सैनिक वाहकाकडे पैसे सुट्टे नाहीत म्हणूनही रावते साहेबांकडे तक्रार करण्याची धमकी देताना दिसतात. अशा वेळी कधी कधी भांडणही सुरू होते. त्यातून मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात.

आपल्याला दिसायला क्षुल्लक असणार्‍या वादाचा फटका कधी कधी एवढा मोठा बसतो की आपण आयुष्यात एखादी मोठी संधी गमावून बसतो. मुंबईत टॅक्सी चालकाबरोबर वाद हे मुंबईकरांना नित्याचीच गोष्ट, पण अशा वादामुळेच नियुक्ती आधीच एका व्यक्तीची गलेलठ्ठ पगाराची सीईओची नोकरी गेली. एखाद्या कंपनीचा सीईओ बनण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव आणि शिक्षण दोन्ही त्या व्यक्तीकडे होते. सीईओ बनण्यासाठी ती व्यक्ती टॅक्सीने कंपनीच्या कार्यालयात चालली होती. तिला वेळेवर कंपनीत पोहचायचे होते. वाहतूक कोंडीमुळे त्याला उशीर होत होता. आपण वेळेत पोहचू का नाही अशी त्याची घालमेल होत होती. त्यामुळे त्याने चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे चालक काहीच करू शकत नव्हता. त्याने या व्यक्तीला कंपनीत सोडल्यावर त्याची तक्रार कंपनीकडे केली. व्यवस्थापनाने ती तक्रार गंभीरपणे घेतली. एखादी व्यक्ती जर पाऊस आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्यांमुळे आपला स्वतःवरचा ताबा सोडून चालकाशी भांडण करीत असेल, तर मग तो सीईओ म्हणून त्याच्या समोर येणारी आव्हाने आणि समस्या यांना कसे तोंड देऊ शकेल. त्याला सीईओ पद दिल्यास तो संकटांना कसा सामोरा जाईल याचा विचार करून व्यवस्थापनाने त्याला सीईओ पद न देण्याचा निर्णय घेतला.

-नितीन देशमुख (7875035636)

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply