क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव
इंदूर : वृत्तसंस्था
अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला.
पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. राहुल चौधरी, अजय ठाकूर यांनी अत्यंत चतुराईने चढाया करीत दिल्लीच्या बचावफळीतील कमकुवत बाजूंवर प्रहार केला. उजव्या कोपर्यातील रवींद्र पेहल आणि राईट कव्हर विशाल माने थलायवाजच्या चढाईपटूंवर अंकुश ठेऊ शकले नाहीत. जोगिंदर नरवाल आणि मिराज शेख यांनी पहिल्या सत्रात दिल्लीकडून चांगली झुंज दिली. दुसर्या बाजूला थलायवाजने अष्टपैलू खेळ केला. चढाईपटूंसोबत बचावफळीत मनजीत छिल्लर, मोहीत छिल्लर यांनी महत्त्वाचे गुण कमावत आपल्या संघाची आघाडी कायम राखण्यात मोलाचा वाटा उचलला. मध्यांतरापर्यंत थलायवाजचा संघ 18-11 अशा फरकाने आघाडीवर होता.
दुसर्या सत्रात दिल्लीने चांगले पुनरागमन केले. इराणी खेळाडू मिराज शेखने चढाईमध्ये महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. थलायवाजच्या भक्कम बचावफळीला खिंडार पाडत दिल्लीने दुसर्या गुणात गुणांची कमाई केली, मात्र बचावफळीतल्या खेळाडूंचे अपयश दिल्लीला सामन्यात आघाडी घेऊ देत नव्हत. उजव्या कोपर्यातला अनुभवी खेळाडू रवींद्र पेहल या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने आपल्या अनुभवाचा आणि उंचीचा फायदा घेत पेहलला संघाबाहेर ठेवले.
मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याची संधी गमावली. याचा फायदा घेत एका क्षणाला सर्वबाद होण्याच्या काठावर आलेल्या थलायवाजने सामन्यात दमदार पुनरागमन केले. थलायवाजच्या बचावफळीने मिराज शेखची सुंदर पकड करत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने फिरविले, मात्र सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना दिल्लीच्या नवीन कुमारने केलेल्या एका चढाईमुळे सामन्याचे चित्र संपूर्णपणे पालटले.
एका चढाईत तीन गुणांची कमाई करीत नवीनने दिल्लीची पिछाडी कमी केली. यानंतर थलायवाजच्या अखेरच्या चढाईपटूची सुरेख पकड करीत दबंग दिल्लीने 29-29 अशी बरोबरी साधली. दिल्लीसाठी सामन्यातली अखेरची चढाई करो या मरोची असताना मनजीत छिल्लरचा पाय अंतिम रेषेच्या बाहेर पडला. या क्षुल्लक चुकीच्या जोरावर थलायवाजने आपल्या हातात आलेला सामना दिल्लीच्या पदरात टाकला. दिल्लीकडून दुसर्या सत्रात नवीन कुमारने आश्वासक खेळी केली.