पनवेल ः बातमीदार
पनवेलमधील कामोठे शहरात स्वाइन फ्लूची लागण होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर आणखी एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. कामोठे शहरातील सेक्टर 17 येथील जिजाऊ सोसायटीत राहणारे नाना बजाबा सहाणे यांचे दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे निधन झाले. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक या नामांकित रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय कामोठ्यात आणखी एक रुग्ण परशुराम गायकवाड हे स्वाइन फ्लूवर उपचार घेत आहेत. खांदा कॉलनीतील मोरे रुग्णालयामध्ये उपचार घेऊन सुधारणा न झाल्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. आणखीही काही रुग्ण स्वाइन फ्लूमुळे त्रस्त असण्याची भीती व्यक्त होत आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुण भगत यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र लिहून महापालिका हद्दीतील स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्याआधीच जनजागृती करण्याची मागणी केली आहे.
स्वाइन फ्लूमुळे रुग्ण दगावल्याचा अहवाल अद्याप आमच्यापर्यंत आलेला नाही. पावसाळ्यापूर्वीच्या आजारासाठी महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू असून बॅनर, पत्रके वाटण्यात आली आहेत. आता स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळ्यास संबंधित परिसरात जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल, तसेच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
-प्रज्ञा नरवडे, आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका