कर्जत : बातमीदार – नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या वाल्मिकीनगर शाळेतील स्वच्छतागृह रविवारी (दि. 28) रात्री वादळी वार्यासह आलेल्या पावसाने कोसळले. स्वच्छतागृहाचे पत्रे उडून गेले. त्यावेळी रात्रीची वेळ असल्याने
जीवितहानी झाली नाही. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीतर्फे या स्वच्छतागृहाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती उपसरपंच अंकुश शेळके यांनी दिली आहे.
वाल्मिकीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा इयत्ता चौथीपर्यंत असून शाळेच्या बाजूला मुलांचे आणि मुलींचे स्वच्छतागृह आहे. त्यातील शाळेच्या मोहाचीवाडी बाजूला असलेले स्वच्छतागृह रविवारी रात्री वादळी वार्याने कोसळले. त्या स्वच्छतागृहावरील सिमेंट पत्रेही उडून जात बाजूला शाळेच्या समोर पडले, मात्र रात्रीची वेळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. सर्व पत्रे शाळेच्या समोर येऊन पडल्याने सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना तुटलेल्या सिमेंट पत्र्यावरून शाळेत जावे लागत होते. मुख्याध्यापिका प्रेरणा मुसळे यांनी सरपंच जान्हवी साळुंखे, उपसरपंच अंकुश शेळके, कर्जत पं. स. सदस्या सुजाता मनवे, जि.प. सदस्या अनसूया पादिर यांना सदर घटनेची माहिती दिली.
सरपंच साळुंखे आणि उपसरपंच शेळके यांनी शाळेत येऊन वादळी वार्यात नुकसान झालेल्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे तात्काळ नव्याने स्वच्छतागृहाचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन स्थानिक ग्रामस्थ अनंता भोईर, प्रकाश मुकणे यांना दिले आहे.