उरण ः काव्य दरबार या उरणमधील नावाजलेल्या साहित्यिक संस्थेने चिरले येथे वर्षा सहलीचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्ह्यातील कवी उपस्थित होते. आगरी कवितांचे बादशहा पुंडलिक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रकाश ठाकूर, हरिभाऊ घरत, ए. डी. पाटील, राजेंद्र नाईक, काशिनाथ मढवी, हरिश्चंद्र माळी, प्रदीप मुंबईकर आदींसह अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार धनंजय गोंधळी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.
तरुणाकडून वडिलांची हत्या
नवी मुंबई : नेरूळ येथील एका भाजी व्यापार्याच्या हत्येचे गूढ उकलले असून व्यसनाधिन असलेल्या मुलानेच तीन लाखांची सुपारी देत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अनिल गुंड (वय 31), संतोष लांडे (वय 25) आणि रोहन बरगे (वय 25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. एपीएमसीमध्ये भाजीचा व्यवसाय करणारे अरविंद गुंड हे राहण्यास नेरूळ येथील शिरवणे गावात होते. त्यांना अनिल हा मुलगा आणि एक मुलगी असून ती विवाहित आहे. अरविंद पहाटे 2 वाजता भाजी बाजारात जाऊन लिलाव व इतर व्यवहार आटोपून दुपारी 12च्या सुमारास घरी येत असत. मुलगा अनिल हा काहीही कामधंदा करीत नसत.
चाकूच्या धाकाने 56 हजारांची लूट
पनवेल ः अरेंजा टॉवर इमारतीत घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सदर इमारतीत राहणा़र्या रत्ना शिवदास नायर (55) या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याजवळची 56 हजारांची रोख रक्कम लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी लुटारूसोबत झालेल्या झटापटीत रत्ना नायर किरकोळ जखमी झाल्या आहेत. सीबीडी पोलिसांनी अज्ञात लुटारूविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. सीबीडी सेक्टर-11मधील अरेंजा टॉवर इमारतीत रत्ना नायर कुटुंबासह राहण्यास असून त्या घरामध्ये एकट्याच असताना त्यांच्या ओळखीतला सोफा बनविणारा तरुण त्यांच्या घरी आला होता. सोफा बनविण्याच्या निमित्ताने रत्ना नायर यांची या तरुणासोबत तोंडओळख झाली होती. याचाच फायदा उचलत हा लुटारू रत्ना नायर यांच्या घरी गेल्याने रत्ना नायर यांनी त्याला आपल्या घरामध्ये प्रवेश दिला. या वेळी लुटारूने रत्ना नायर यांच्याशी गप्पा मारण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने संधी साधून आपल्याकडील चाकूचा धाक दाखवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी रत्ना नायर आणि लुटारू यांच्यात झटापट झाली, मात्र 56 हजारांची रोख रक्कम लुटून त्याने पोबारा केला.