चोळे टेपमध्ये आणखी पाचजण पॉझिटिव्ह
पाली : प्रतिनिधी – शिहू ग्रामपंचायत हद्दीतील चोळेटेप येथील एका वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
चोळे टेप येथील महिला मुंबईतील विक्रोळी येथून 16 मे रोजी कुटुंबीयांसह आपल्या गावी आली होती. तिला शुगरचा त्रास होता. त्यामुळे विविध रुग्णालयांत तपासणी करण्यात आली त्या वेळी तिला कोरोना झाल्याचे समोर आले. या वृद्ध महिलेच्या संपर्कात तिचा दीर आला होता. त्यांना दम्याचा त्रास झाल्याने अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, सून, व नातू यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले असता, या सर्वांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सध्या चोळे टेप गाव कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रोहे तालुक्यातही कोरोनाबाधित वाढले
रोहे : प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली असून, गुरुवारी (दि. 28) तीन नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 17 झाल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.
नवे रुग्ण हे सुखदरवाडी एक आणि पाले खुर्द गावातील एक असे आहेत. सुरुवातीला दोन गावांत असलेला कोरोना आता रोहा तालुक्यातील सात गावांत पोहचला आहे. सर्वात आधी ऐनवहाळ तीन व भालगाव दोन असे एकूण पाच पॉझिटिव्ह व्यक्ती 23 मे रोजी आढळल्या होत्या. या दिवसापासून रोह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, त्यानंतर सतत रुग्णांची नोंद होत आहे. पाले खुर्द व सुखदरवाडी येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 व्यक्तींचे नमुने घेऊन मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी येऊन यापैकी तीन व्यक्तींचे नमुने कोरोनाबाधीत आढळले आहेत.