Breaking News

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

मुंबई ः प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 31) जाहीररीत्या भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला. मी सरकारविरोधात अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले. माझ्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. भाजप सत्ताधारी पक्ष आहे म्हणूनच मी भाजपमध्ये आले आहे. लोकांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी आता त्या सोडवून दाखवेन. मी कुठेही पळून गेलेले नाही. मी गद्दार नाही. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच अखेर मी राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचेही चित्रा वाघ यांनी या वेळी स्पष्ट केले.

तत्पूर्वी चित्रा वाघ पतीला वाचवण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांंनी सांगितले होते. ईडी, सीबीआय यांचा वापर लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी केला जात आहे. सरकार राज्य बँकेद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. चित्रा वाघ यांचे पती चौकशीच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ घाबरल्या आहेत. चित्रा वाघ मला भेटल्या असून, पतीच्या बचावासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते, असे शरद पवार म्हणाले होते. आम्ही त्यांना काहीही मदत करू शकत नसल्याचेही पवारांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.

दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपत प्रवेश करताना आपली भूमिका स्पष्ट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळूनच अखेर मी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचे चित्रा वाघ यांनी जाहीर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply