Breaking News

ठाकरे सरकार कोकणात नाणार प्रकल्प राबविणार?

शिवसेनेच्या मुखपत्रात जाहिरात

मुंबई : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील मते मिळवणार्‍या शिवसेनेने आता मात्र यू-टर्न घेतल्याचे दिसते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात नाणार प्रकल्पाचा उदोउदो करणारी जाहिरात छापून आल्याने कोकणात नाणार प्रकल्प राबविला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून, कोकणवासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर भाजपसोबत सत्तेत असतानाही शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणार्‍या नाणार प्रकल्पाला टोकाचा विरोध केला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोकणात नाणारच्या विरोधात प्रचार करून मते मागितली होती. निवडणूक वचननाम्यातही नाणार प्रकल्प बासनात गुंडाळण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते, मात्र आता राज्यात आघाडी सरकारमध्ये सामिल होताच शिवसेनेने नाणारवरून भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे. ’रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल, कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच…’ ही टॅगलाइनही या जाहिरातीत देण्यात आली आहे. नाणार प्रकल्पाची पाठराखण करणार्‍या या जाहिरातीमुळे कोकणवासीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, शिवसेनेना फसवणूक करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना या जाहिरातीबाबत काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या या जाहिरातीवर शिवसेनेचे आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे जाहीरात?

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ’सामना’त नाणार प्रकल्पाची भलामण करणारी जाहिरात आली आहे. या जाहिरातीत नाणार प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होऊन कसा फायदा होणार हे सांगण्यात आले आहे. कोकणात निर्माण होणार्‍या रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांबाबत या जाहिरातीत भाष्य करण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारल्यानंतर कोकणातील दीड लाख लोकांना रोजगार मिळणार असून, 20 हजार लोकांना थेट रोजगार मिळणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply