Monday , June 5 2023
Breaking News

तापमान मोजणार्या यंत्रणेचे वाजले की बारा

नागरिक उष्णतेने व्याकूळ; हवामान खात्याच्या अधिकार्‍यांची भिराकडे पाठ

माणगाव : प्रतिनिधी

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भिरा येथील तापमान 42.0 अंश सेल्सियशवर जाऊन पोहचला होता. त्या वाढत्या तापमानामुळे प्रशासनही पुरते हादरले होते. भिरा येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. पाटणूस (ता. माणगांव) ग्रामपंचायात हद्दीतील भिरा पॉवर हाऊस कंपनीमध्ये बसविण्यात आलेल्या तापमान मापक यंत्राद्वारे तापमानाची नोंद केली जाते. मात्र या तापमान मापक यंत्राकडे हवामान खात्याचे अधिकारी, निरीक्षक फिरकत नसल्याने तापमानाचा अचूक अंदाज सांगणे कठीण झाले असून, या यंत्रणेचे ऐन उन्हाळ्यातच बारा वाजले असल्याचा प्रत्येय ग्रामस्थांना येत आहे.

 भिरा येथील तापमान मापक यंत्रावर गेल्या वर्षी 26 मार्च रोजी राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. तर 28 मार्च 2017 रोजी तापमानाच्या जागतिक उच्चांकाची नोंद भिरा येथेच झाली होती. त्यामुळे भिरा येथील तापमान मापक यंत्राकडे सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. या वर्षी एप्रिल महिन्यातच भिरा येथील तापमान 42 अंश सेल्सियशवर पोचल्यामुळे पुढील दोन महिन्याच्या काळात या उष्णतेत आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तापमान वाढल्यामुळे पाटणूस ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडणे तसेच उष्णतेपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

पाटणूस ग्रामपंचायतीचे दक्षतेचे फलक

ग्रामस्थांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. तसेच डोक्यावर टोपी व तोंडाला रुमाल बांधावा, डोळ्याला गॉगल लावावा, पाणी भरपूर प्यावे, त्याचबरोबर पाणी सोबत ठेवावे अशा प्रकारचे फलक पाटणूस ग्रामपंचायतीने लावले आहेत. उष्माघाताचा धोका संभावत असल्याने लहान मुले, वृध्द व्यक्तींनी महत्वाच्या कामानिमित्तच बाहेर पडावे, बाहेर जातांना आपला पुर्ण चेहरा कापडाने झाकून घ्यावा, सोबत पाण्याची बाटली ठेवावी, असे आवाहन पाटणूस ग्रामपंचायतीने केले आहे.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply