Breaking News

गुडवण पुलाची स्थानिक तरुणांनी केली दुरुस्ती

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील चिल्हार नदीवर असलेल्या गुडवण गावाजवळील पुलावरील डांबर वाहून गेल्याने खड्डेमय रस्त्याने अनेक वर्षे वाहतूक सुरू आहे. त्याबाबत स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, मात्र बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने गुडवण गावातील तरुणांनी श्रमदान व स्वखर्चाने पुलाची दुरुस्ती केली आहे. कर्जत तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गुडवण गावाजवळ चिल्लार नदीवर पूल आहे. 35 वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलाची सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. एकेरी वाहतूक करता येईल असा हा पूल असून, तो नदी पार करण्यासाठी उपयोगात आहे. या पुलाचा पृष्ठभाग खराब झाला असून अनेक ठिकाणी स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया बाहेर निघाल्या आहेत. या पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी बोरिवली आणि गुडवण ग्रामस्थ अनेक वर्षे करीत आहेत. शेवटी स्थानिक तरुणांनी स्वखर्चाने पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. गुडवण गावातील रामदास यशवंत खडे, रोहिदास हरिचंद्र खडे आणि संकेत यशवंत खडे या तिघांनी मजूर कामाला घेतले आणि सोमवारी (दि. 29) दिवसभर काम करून रेती, सिमेंट, प्लास्टर यांच्या सहाय्याने पुलावरील खड्डे बुजविले. व पुलाचा 60 मीटर लांबीचा पृष्ठभाग पुन्हा नवा तयार केला. त्यांच्या या कामामुळे गणेशोत्सवाच्या काळात सर्वांना पुलावरून वाहतूक करता येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply