ऑगस्ट महिना उजाडला तोच मुळी जोरदार पाऊस घेऊन. राज्यात मुसळधार पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पुराने थैमान घातले. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. उभी पिके बुडाली. ’जारे जारे पावसा, तुला देतो पैसा,’ असे म्हणण्याची वेळ आली. प्रशांत महासागरात असलेले रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल थडगे आहे. पर्यावरणाचा र्हास होतो म्हणजे काय होते? व्यवस्था कोसळते म्हणजे नेमके काय होते? निसर्गाची चाललेली हानी पाहता साठा उत्तरांची ही कहाणी पाचा उत्तरी निष्फळ आणि अपूर्ण ठेवायची की सुफळ संपूर्ण करायची हे आता आपल्याला ठरवावे लागेल.
आटपाटनगर होते. तिथे मारीरंगा नावाचा राजा राज्य करीत असे. या नगराच्या शेजारील राजे येता-जाता या राज्यावर आक्रमण करीत होते. या कटकटीला कंटाळून मारीरंगाने आपले नगर सोडून दुसर्या ठिकाणी आपले राज्य वसवण्याचे ठरवले. नव्या राज्याच्या शोधात तो समुद्रसफरीवर निघाला. जुन्या नगरापासून हजार मैल दूर थेट महासागराच्या मधोमध त्याला ज्वालामुखीच्या विस्फोटातून बनलेले बेट सापडले. पूर्णतः जंगलाने आच्छादलेल्या त्या बेटावर झाडावर खोपे बांधून जगणार्या आणि जमिनीवर राहणार्या पक्ष्यांच्या प्रजाती होत्या. किनार्यावर सील मासे होते आणि असंख्य खेकडे व जिवंत शिंपल्यांनी समुद्रकिनारा व्यापून गेला होता. त्याला त्याने रापानुई असे नाव दिले.
येथे राज्य वसविण्याचे ठरवल्यानंतर सर्वप्रथम एका भागातली जंगले सपाट करून तिथे शेतीयोग्य जमीन बनवली. डोंगरमाथ्यावर असलेल्या तळ्यांमधून कालव्याने पाणी खाली आणून शेती करण्यात आली. रापानुईच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला होता. लवकरच शेतीत रताळी आणि कंदमुळाखेरीज केळीच्या बागाही फुलू लागल्या. रताळ्याचा शिरा आणि केळीची शिकरणे खाऊन लोक सुखावले. काही दिवस गेले. लवकरच हळदीचेही उत्पादन शक्य झाले. मसाल्याचा पदार्थ आहारात आल्यानंतर जेवण अधिक रुचकर झाले. कंदमुळांची लोणची घातली जाऊ लागली. एकदा कुणीतरी बेटावर ऊस आणला. जंगलाला फुकट जाणारे पाणी वळवून ते उसासाठी वापरले जाऊ लागले. उसाचा रस रताळ्याच्या शिर्याला गोडवा देऊ लागला. उसाच्या रसाला आंबवून छान दारू बनू लागली. लवकरच रापानुई एक खातेपिते आणि संपन्न राज्य बनले.
रोज तेच तेच अन्न खाऊन लोक कंटाळले होते. त्यामुळे मासे पकडण्यासाठी होडीतून बेटापासून दूर खोल समुद्रात जाऊन मासे घेऊन येऊ लागले. श्रीमंतांच्या अन्नांत वैविध्य आले. पाम झाडांच्या बुंध्यापासून होड्या बनवेपर्यंतही तसे व्यवस्थित सुरू होते. कधी मासे मिळणे, कधी न मिळणे हा नशिबाचा भाग आहे असे काहींना वाटले. आता नशीब आले म्हणजे दैव आले आणि दैव आले म्हणजे देव आला. वरचेवर डोंगरात जाऊन तिथल्या खडकांमध्ये फिरणार्या रापानुईच्या लोकांना त्या खडकात देव दिसू लागले. त्या खडकांतून कोरून त्यांचे पुतळे उभारले जावे, अशी शक्कल कुणीतरी मांडली. यथावकाश पुतळ्यांचे निर्माणकार्य सुरू झाले. डोंगर फोडून त्यातून विशाल कातळशिल्पे बाहेर काढली जाऊ लागली. गावांत चबुतर्यांवर त्यांची प्रतिष्ठापना होऊ लागली. ह्या देवांना भरपूर गूळ टाकलेला रताळी आणि केळ्यांचा शिरा, माशांचे शेलके तुकडे आणि कोंबड्यांचे मांस नैवेद्यात देण्याची पद्धत सुरू झाली. लोक चविष्ट खाण्याला, उसाची दारू पिण्याला आणि पुतळ्यांसमोर रोज रात्री नाचगाणी करायला चटावले.
काही वर्षे गेली. माशांचा तुटवडा जाणवू लागला. समुद्रात वरचेवर बदल होतात आणि त्यामुळे त्यातल्या जलचरांचे अधिवास बदलत राहतात हे लोकांना माहीत नव्हते. त्यांनी ह्या समस्येसाठी पुतळ्यांना कौल लावले. भजने म्हटली आणि तरीही माश्यांची आवक काही वाढेना. बोटींची संख्या वाढविण्याचे ठरले. त्यासाठी उरलीसुरली पाम झाडे तोडावी लागणार होती. आपण असे करू नये, थोडी झाडे तरी राहू द्यावीत, असे काही लोकांचे म्हणणे होते, पण राज्याच्या वंशजांना ते काही पटेना. त्यांना माशांच्या उत्पन्नात वृद्धी हवी होती. बेटावरची शक्य तितकी पाम झाडे तोडून त्यापासून होड्या बनविल्या गेल्या. होड्यांची संख्या वाढली तशी माशांची आवक वाढली. देव प्रसन्न झाला म्हणून नगरवासी आनंदित झाले आणि त्यांनी पुतळ्यांचे निर्माणकार्य आणखी जोमाने सुरू केले. बाहेरून माणसे आणली गेली. दरम्यान, बेटावर नव्याने दाखल झालेल्या लोकांसोबत आणखी एक जीव दाखल झाला, तो म्हणजे पॉलेनेशियन उंदीर.
पॉलेनेशियन उंदराला खाणारा कुठलाही नैसर्गिक शिकारी प्राणी बेटावर शिल्लक नसल्याने उंदरांची संख्या जोमाने वाढू लागली. उंदरांनी उरलीसुरली पाम झाडे खाऊन संपविली आणि नंतर आपला मोर्चा अन्नधान्याकडे वळवला. शेतातल्या उभ्या पिकावर उंदरांचा हल्ला होऊन मोठी नासाडी होऊ लागली. या संकटामुळे देवाचा मोठा कोप झाला असे वाटून राजाने पुतळ्यांचे निर्माणकार्य आणखी जोरात सुरू केले, पण त्याचा उपयोग झाला नाही. लवकरच एकूण एक झाड नष्ट होऊन त्याचे एका सपाट पण हिरव्या वाळवंटात रूपांतर होऊ लागले. समुद्रावरून येणार्या वार्याने सोबत आणलेल्या क्षारांमुळे जमीन आता खारट आणि नापीक होऊ लागली होती. पाण्याची पातळी कमी झाल्याने सर्व जमिनीवर धूळ साचू लागली. शेतीतून पुरेसे उत्पन्न येत नसल्याने लोक भुकेने तडफडू लागले.
भुकेने व्याकुळ लोकांचा राजा आणि देवावरील विश्वास उडाला. त्यांच्यात भांडणे होऊ लागली. एकेकट्या माणसावर इतर लोक टोळ्यांनी हल्ले करू लागले. त्याला मारून त्याचे मांसही खाऊ लागले. रापानुई एक जिताजागता नरक झाला. बाह्यजगापासून हजारो मैल दूर असल्याने बरेचसे लोक बेटावरच अडकून पडले. सिफीलीस आणि देवीच्या आजारांनी या लोकांना ग्रासले. त्यामध्ये त्यांचा अंत झाला. यथावकाश रापानुईची लोकसंख्या अवघी 111 लोकांवर आली. ते बेट प्रशांत महासागराच्या मधोमध आजही उभे आहे. रापानुई हे स्थानिक नाव असलेल्या बेटाला जगभर इस्टर आयलंड्स म्हटले जाते. चिली देशाच्या मुख्य भूमीपासून साडेतीन हजार किलोमीटर दूर रापानुई हे एकाच वेळी माणसांच्या सफलतेचे आणि विफलतेचे विशाल थडगे आहे. जगभरातील लोक इस्टर आयलंडला भेट देत असतात. लोक हिंसक होतात तेव्हा काय करतात, पर्यावरणाचा र्हास होतो म्हणजे काय होते? व्यवस्था कोसळते म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नांचीही उत्तरे काही लोक येथे येऊन शोधत असतात.
-नितीन देशमुख, फेरफटका